संतोष वळसे पाटील
मंचर : श्रीक्षेत्र भीमाशंकर हे महाराष्ट्रातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक पवित्र स्थळ असून, दरवर्षी लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. मात्र, पर्वतीय रस्ता आणि लांबचा प्रवास, यामुळे अनेकांना अडचणींना सामोरे जावे लागते.(Latest Pune News)
राज्य सरकारने यावर उपाय म्हणून कर्जत-नेरुळ मार्गावरून श्रीक्षेत्र भीमाशंकरला जोडणारा रोप-वे प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रकल्प महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ आणि सार्वजनिक-खासगी भागीदारी तत्त्वावर राबविण्याचा विचार आहे.
या प्रकल्पाचा उद्देश भाविकांना कमी वेळेत आणि सुरक्षितरीत्या पर्वतावर पोहचविणे असा आहे. प्रस्तावित रोप-वे मार्ग साधारण 3 किलोमीटरचा असून, त्याद्वारे रस्त्यावरील सुमारे 100 किलोमीटर प्रवासाची बचत होईल, असा प्राथमिक अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
सध्या मुंबई-पुणे परिसरातून भाविकांना श्रीक्षेत्र भीमाशंकरला पोहचण्यासाठी लोणावळा-तळेगाव-चाकण-राजगुरुनगर-मंचरमार्गे प्रवास करावा लागतो. हा प्रवास पर्वतीय वळणांनी भरलेला असल्याने वेळखाऊ ठरतो. साधारण 220 ते 240 किलोमीटरचे हे अंतर पार करण्यासाठी पाच ते सहा तास लागतात. रोप-वे मार्ग सुरू झाल्यास हा वेळ निम्म्यावर येऊ शकतो. कर्जत किंवा नेरुळ येथून गाडीने थेट रोप-वे स्थानकापर्यंत येऊन पुढील प्रवास केबल कारद्वारे करता येईल. यामुळे इंधनाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल. पर्यटन विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार या मार्गामुळे दरवर्षी लाखो लिटर डिझेल-पेट्रोलची बचत होण्याची शक्यता आहे.
सध्याच्या लांबच्या रस्त्याव्यतिरिक्त रोप-वे वापरून वेळ आणि इंधन वाचविता येईल. ही सुविधा आर्थिक बचतीसह सोईस्कर प्रवास आणेल आणि भाविकांच्या दैनंदिन प्रवासाचा अनुभव सुधारेल.दादाभाऊ पोखरकर, संचालक, भीमाशंकर साखर कारखाना
श्रीक्षेत्र भीमाशंकरला जाण्यासाठी हा रोप-वे मार्ग तयार झाला, तर पर्वतावरील अवघड रस्त्यापेक्षा थेट आणि आरामदायी मार्ग मिळेल. हे आमच्यासारख्या नियमित भाविकांसाठी खूप आनंददायी आणि उपयुक्त ठरेल.किसनशेठ उंडे, उद्योजक, मुंबई