नानगाव: दौंड व शिरूर तालुक्याला वरदान ठरलेल्या भीमा नदीपात्रात या महिन्यात मोठ्या प्रमाणावर जलपर्णी वाढत चालली आहे. काही ठिकाणी जलपर्णीने नदीपात्र वेढले आहे. त्यामुळे सध्या जलपर्णीमुळे भीमेचा श्वास गुदमरत चालल्याची वस्तुस्थिती पाहावयास मिळत आहे.
नदीपात्रात यंदा जलपर्णीची वाढ लवकर झाली असून, काही ठिकाणी नदीपात्र झाकून टाकले आहे. सध्या ही जलपर्णी छोटी असली तरी काही दिवसांतच झपाट्याने वाढणार आहे. या वाढणाऱ्या जलपर्णीमुळे दोन्ही तालुक्यांतील नदीकाठावरील गावातील मच्छीमारीचा व्यवसाय संकटात आला आहे. मासेमारी व्यवसाय करणाऱ्या कुटुंबांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागते. वाढलेली जलपर्णी काही दिवसांनी पाण्यातच कुजून जाते. त्यामुळे नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी येते. तसेच, डासांचाही प्रादुर्भाव वाढतो. याचा त्रास परिसरातील नागरिकांना सहन करावा लागतो. जलपर्णीची ही समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत आहे. मात्र, याकडे कायमच दुर्लक्ष होत आल्याचा आरोप होत आहे.
जलपर्णीने शेतकरी त्रस्त
जलपर्णी वाढत जाते तसा शेतकऱ्यांसह परिसरातील नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते. विद्युत मोटारीचे फुटवॉल्व्ह पाण्यामध्ये असतात. या फुटवॉल्व्हमध्ये जलपर्णी सतत अडकते. त्यामुळे शेतकऱ्यांना ही समस्या मोठ्या प्रमाणावर अडचणीची ठरते, तर डास आणि दुर्गंधीमुळे नागरिक हैराण होतात. यावर वेळीच उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.