बावडा: उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये मंगळवार (दि. 8) पासून 10 हजार क्युसेकने सुरू असलेला पाण्याचा विसर्ग हा गुरुवारी (दि. 10) सकाळी 10 वाजेपासून 15 हजार क्युसेक एवढा करण्यात आला आहे. त्यामुळे भीमा नदीला इंदापूर तालुका व सोलापूर जिल्ह्यामध्ये पुन्हा पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.
उजनी धरणामध्ये गुरुवारी सायंकाळी 6 वाजता पाणीसाठ्यात वाढ होऊन तो 113.72 टीएमसी झाला आहे. त्यामुळे उपयुक्त पाणीसाठा देखील वाढ होऊन तो 50.06 टीएमसी झाला आहे. परिणामी सध्या धरणातील उपयुक्त पाणीसाठा हा 93.44 टक्के एवढा झाला आहे. (Latest Pune News)
तसेच धरणातून बोगद्यामध्ये पाण्याचा विसर्ग 400 क्युसेक, मुख्य कालव्यातून 1 हजार 900 क्युसेक, सीना माढा योजना 180 क्युसेक, दहिगाव उपसा योजना 80 क्युसेक याप्रमाणे पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
धरणाच्या सांडव्यातून सोडण्यात येत असलेले 15 हजार क्युसेक व वीज निर्मितीसाठी सोडण्यात येत असलेले 1 हजार 600 क्युसेक पाणी हे नदीपात्रात येत आहे. त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीपात्रात येणार्या पाण्याचा एकूण विसर्ग गुरुवारी सायंकाळी 6 वाजता 16 हजार 600 क्युसेक एवढा झाला आहे. सध्या दौंड येथून उजनी धरणामध्ये येणार्या पाण्याचा विसर्ग 19 हजार 998 क्युसेक एवढा आहे.
उजनी धरणातील पाणी साठ्यामध्ये घट
पंढरपूर येथे झालेली आषाढी यात्रा लक्षात घेऊन तेथे आलेल्या 15 ते 20 लाख भाविकांची सुरक्षितता लक्षात घेऊन, संभाव्य पूर परिस्थिती आतापासूनच आटोक्यात आणण्यासाठी उजनी धरणातील पाणीसाठा नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे सध्या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग दररोज सुरू ठेवण्यात आला आहे. त्यामुळे उजनी धरणातील मंगळवार रोजीचा पाणीसाठा 102.26 टीएमसीवरून बुधवारी 101.28 टीएमसी झाल्याचे दिसून आले.
पंढरपूर यात्रेमुळे आठवडाभर बंद होता विसर्ग
पंढरपूरच्या आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवर, पुंडलिकाच्या वाळवंटामध्ये चंद्रभागा नदीपात्रातील वारकर्यांच्या सुरक्षिततेसाठी उजनी धरणातून भीमा नदीपात्रामध्ये सोडण्यात येत असलेल्या 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग बुधवारी (दि. 2) मध्यरात्री 12 वाजता बंद करण्यात आला आहे. त्यानंतर पुन्हा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग मंगळवारी (दि. 8) सकाळी 10 वाजता 10 हजार क्युसेकने सुरू करण्यात आला.