Sugar Factory file photo
पुणे

Bhima-Patas Sugar factory : 'भीमा पाटस'ची प्रारूप मतदार यादी बुधवारी होणार जाहीर, २८ ऑगस्टपर्यंत सूचना-हरकती मागविल्या

११ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर होणार : 'दौंड'च्या आखाड्यात कुल-थोरात पुन्हा आमनेसामने?

पुढारी वृत्तसेवा

Bhima-Patas Sugar factory election

पुणे : दौंड तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक डॉ. प्रगती बागल यांनी कारखान्याच्या मतदारांची प्रारूप मतदार यादी बुधवारी (दि. १९) प्रसिद्ध करण्याबाबतच्या सूचना कारखान्याच्या प्रशासकांना दिल्या आहेत. त्यानुसार प्राथमिक मतदार यादी जाहीर करून, त्यावर प्राप्त होणाऱ्या सूचना व हरकतींच्या प्रक्रियेनंतर यादी अंतिम करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

१९ ऑगस्ट रोजी कारखान्याची प्रारूप मतदार यादी पाच ठिकाणी प्रसिद्ध केली जाणार आहे. यामध्ये पुणे प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालय (साखर संकुल, शिवाजीनगर, पुणे), भीमा सहकारी साखर कारखाना, दौंड साहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालय, बारामती साहाय्यक निबंधक (सहकारी संस्था) कार्यालय आणि दौंड तहसीलदार कार्यालय यांचा समावेश आहे.

मतदारांना या प्रारूप मतदार यादीवर आपल्या हरकती अथवा आक्षेप २८ ऑगस्टपर्यंत प्रादेशिक साखर सहसंचालक, पुणे (साखर संकुल, पहिला मजला, शिवाजीनगर, पुणे) यांच्याकडे किंवा rjdpune.election@gmail.com या ई-मेलवर पाठवायचे आहेत. दाखल हरकती व आक्षेपांवर सुनावणी घेऊन ७ सप्टेंबर २०२६ पर्यंत निर्णय दिले जातील. त्यानंतर कारखान्याची अंतिम मतदार यादी ११ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

कुल-थोरात सामना पुन्हा रंगणार!

दौंड तालुक्याच्या राजकारणाचा मुख्य केंद्रबिंदू हा भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना राहिला आहे. कारखान्याच्या निवडणुकीवरून मागील काही वर्षांत दोन्ही गटांत सातत्याने राजकीय संघर्ष पाहायला मिळाला आहे. यंदाही कारखान्याचे अध्यक्ष व भाजपचे आमदार राहुल कुल विरुद्ध माजी आमदार रमेश थोरात यांच्यात पुन्हा एकदा सामना रंगण्याची चिन्हे आहेत. महायुतीचे घटक असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील राजकीय सामना या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही लढत पुढे काय वळण घेते, हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT