भिगवण: जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्याने तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत. तालुक्यात भिगवण-शेटफळगढे गटाच्या राजकीय बालेकिल्ल्यात तर अनपेक्षित घडामोडीने राजकीय गोंधळ उडाला आहे. अंतर्गत नाराजीनाट्य वाढले असले तरी मामा-भाऊंच्या भेटीनंतर नाराज उमेदवारांची मनधरणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. असे असले तरी अर्ज माघार घेण्याच्या 27 ताखेनंतरच गटाच्या लढतीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
सध्या तरी राष्ट्रवादी व भाजप अशी रंगत दिसत असली तरी अपक्षांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. या भागातील नाराज गट अपक्षांना पाठबळ देऊन तिसऱ्या आघाडीच्या तयारीत आहेत. असे झाल्यास राष्ट्रवादीला याचा फटका बसून जोरदार तयारी करावी लागणार आहे. नाराज गटाला समजण्यात लोकप्रतिनिधींना यश आल्यास राष्ट्रवादी आणि भाजप अशी दुरंगी लढत होईल, तर काही अपक्ष देखील आपले जनमत अजमावण्याची शक्यता नाकारता येत नाही.
जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक जाहीर होताच तालुक्यात दोन्ही राष्ट्रवादी व भाजप अशी तिरंगी लढत अपेक्षित होती. परंतु, दोन राष्ट्रवादी एकत्र झाल्या आणि राष्ट्रवादी-भाजप अशा थेट लढतीचे चित्र निर्माण झाले आहे. शिवसेनेसह अपक्ष व इतर लहान पक्ष देखील रिंगणात उतरले आहेत.
इंदापूर तालुक्याचा राजकीय बालेकिल्ला समजलेल्या भिगवण-शेटफळगढे गटात मोठी रस्सीखेच मानली जाते. मात्र, या गटातच यावेळी राजकीय नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. जातीय समीकरणे आणि बदललेल्या राजकीय समीकरणाने या गटात अनेक इच्छुकांच्या अपेक्षेवर आणि तयारीवर पाणी फेरले आहे. निवडणूक जाहीर झाल्यानंतर बहुतांश इच्छुकांनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता.
मात्र, राष्ट्रवादी व भाजपाने अधिकृत उमेदवार जाहीर करताच या गटाची दिशाच बदलली आहे. वरकरणी कितीही नाराजी लपवली जात असली तरी आतील सुरू असलेली धुसफूस नाट्यमय घडामोडीत रूपांतर होऊ शकते, अशी आजची स्थिती आहे. त्यातून पक्षाची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे आहेत. मात्र, एकत्र झालेल्या मामा-भाऊंनी नाराज उमेदवारांची नाराजी दूर केली तर मात्र राष्ट्रवादी व भाजप अशीच लढत निश्चित होईल.