भिगवण: आयुष्यभर कष्ट करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या एका वृद्ध महिलेच्या मृत्यूनंतर तिचा मुलगा आणि मुलीने अंत्यविधीकडे पाठ फिरवल्याची धक्कादायक घटना भिगवण (ता. इंदापूर) परिसरात घडली. अखेर गावातील संवेदनशील तरुणांनी पुढाकार घेत या माउलीला खांदा दिला आणि तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
गुरुवारी दि. २९ ऑक्टोबर रोजी वृद्धापकाळाने महिलेचे निधन झाले. आयुष्यभर जेवणाचे डबे आणि बेकरीचा व्यवसाय करून तिने कष्टाने संसार चालवला होता. आईच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर एक मुलगी घटनास्थळी आली. दुसऱ्या मुलीला निरोप दिला असता नुकतेच ऑपरेशन झाले असून, डॉक्टरांनी रडण्याच्या प्रसंगांना उपस्थित राहण्यास मनाई केल्याचे कारण तिने सांगितले.
दुसरीकडे, मुलानेही अंत्यविधीसाठी येण्याचे टाळले. जन्मदात्या आईच्या अंत्यविधीसाठी मुले उपस्थित नसल्याने अखेरीस गावातील राहुल गाडे, अमितकुमार वाघ, संजय गिते, रोहित भरणे आणि बाळू मोहिते या तरुणांनी पुढाकार घेतला. त्यांनी अंत्यविधीचे धार्मिक सोपस्कार पूर्ण केले तसेच आईसमान या माउलीला खांदा देत तिच्यावर अंत्यसंस्कार केले.
या घटनेमुळे कौटुंबिक नात्यांमधील दुरावा आणि वृद्ध माता-पित्यांप्रती असलेल्या जबाबदारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. आयुष्यभर मुलांसाठी कष्ट करणाऱ्या आईला अखेरच्या क्षणी मुलांचा आधार मिळू नये, ही बाब समाजासाठी आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे. रक्ताच्या नात्यांनी साथ सोडली, तरी गावातील तरुणांनी माणुसकी जपत दिलेला आधार प्रेरणादायी ठरला.