भीमा-पाटस साखर कारखान्याची सभा खेळीमेळीत पार, विरोधकांशी चर्चा Pudhari
पुणे

Bheema Patas Sugar Factory: भीमा-पाटस साखर कारखान्याची सभा खेळीमेळीत पार, विरोधकांशी चर्चा

आ. राहुल कुल यांनी साखर साठा, कामगार देणी व बँकेच्या मुद्द्यांवर दिली स्पष्ट उत्तरे

पुढारी वृत्तसेवा

खोर/यवत : दौंड तालुक्यातील भीमा-पाटस सहकारी साखर कारखान्याची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष आमदार राहुल कुल यांच्या उपस्थितीत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. विविध मुद्द्‌‍यांवर झालेल्या चर्चेमुळे सभेला रंगत आली. (Latest Pune News)

सभेच्या सुरुवातीला कारखान्याचे संस्थापक मधुकर शितोळे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी आ. कुल म्हणाले की, कारखाना आर्थिक अडचणींवर मात करीत योग्य दिशेने वाटचाल करीत आहे. मागील वर्षी सभासदांना 3 हजार रुपये दर दिला आहे. शेतकरी, सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना सुरू आहेत. केंद्र व राज्य सरकारकडून साखर उद्योगासाठी सकारात्मक धोरणे राबवली जात आहेत. कारखान्याचे कामकाज निराणी ग््रुापकडे असले तरी मालकी हक्क शेतकऱ्यांचाच आहे. त्यामुळे कुठल्याही प्रकारचे राजकारण न करता संस्थाहिताला प्राधान्य द्यावे.

सभेदरम्यान माजी आमदार रमेश थोरात व आ. कुल यांच्यात साखरेचा साठा, कामगारांची देणी आणि जिल्हा बँकेच्या जप्ती आदेशांबाबत वादविवाद झाले.

थोरात यांनी कामगारांच्या देणीबाबत आणि साखरेच्या साठ्याबाबत प्रश्न उपस्थित केले. त्यावर उत्तर देताना आ. कुल म्हणाले की, जप्तीच्या काळात कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेकडे होता. आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून कारखाना चालवत आहोत.

निवृत्त व विद्यमान कामगारांच्या देणीबाबत मनोज फरतडे यांनी प्रश्न उपस्थित केला. या वेळी आ. कुल यांनी युनियनसोबत ठरल्याप्रमाणे सर्व देणी दिली जातील, असे सांगितले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रस प्रदेश प्रवक्त्या वैशाली नागवडे यांनी सभासदांना दिवाळीला 20 किलो साखर देण्याची मागणी केली. कारखान्याच्या करारपत्राची प्रत सभासदांना मिळावी, अशी मागणीही त्यांनी केली. रमेश थोरात यांनी बँकेकडून कारखान्यास मिळालेल्या सवलतींबाबतही प्रश्न उपस्थित केला. बाजार समितीचे संचालक अतुल ताकवणे म्हणाले की, गेल्या 15 वर्षांतील पहिली सभा ही खेळीमेळीतच पार पडली.

या वेळी उपाध्यक्ष नामदेव बारवकर, नितीन दोरगे, ज्योती झुरुंगे, गणेश जगदाळे, तानाजी केकाण, बापूराव भागवत आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक विकास शेलार यांनी केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक तुषार पवार यांनी अहवाल सादर केला. तुकाराम ताकवणे यांनी आभार मानले. आ. कुल यांची सार्वजनिक उपक्रम समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अशोक हंडाळ यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. पाटस (ता. दौंड) येथे भीमा सहकारी साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत बोलताना आ. राहुल कुल. (छाया : रामदास डोंबे)

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT