भोर : भाटघर धरणाच्या बुडीत क्षेत्रातील असणारी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली असून ज्यांनी बेकायदेशीर बांधकामे केली असतील तर त्यांनी सात दिवसांच्या आत काढून घ्यावी, असे आवाहन जलसंपदा विभागाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी केले आहे.
भोर तालुक्यातील भाटघर धरणाच्या बुडीत क्षेत्रात पाण्याला लागून बेकायदेशीरपणे रिसॉर्टचे बांधकाम करण्यात आलेले आहे. धरणाच्या प्रतिबंधित क्षेत्रात निवंगणी (ता. भोर) येथील सीमा फार्म रिसॉर्टद्वारे करण्यात आलेले अनधिकृत बांधकाम जलसंपदा विभागाकडून नोटीस देऊन काढण्यात आले. पुढील सात दिवसांत अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जाणार असल्याचे सहायक अभियंता योगेश भंडलकर यांनी सांगितले.
जलसंपदा विभागाच्या जागेतील अतिक्रमणे हटवण्याबाबत निर्देश देण्यात आलेले असून, भाटघर धरणाच्या बुडीत क्षेत्रामधील अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत. जलसंपदा विभागामार्फत अतिक्रमण हटवण्याची मोहीम सुरू करण्यात आली असून, निरा पाटबंधारे उपविभागाचे सहायक अभियंता योगेश भंडलकर व भाटघर पाटबंधारे शाखेचे सहायक अभियंता गणेश टेंगले यांचेमार्फत अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आलेल्या असून अतिक्रमण हटवण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे.
वेळवंत खोऱ्यातील निवंगणी येथील सीमा फार्म रिसॉर्टच्या वतीने भाटघर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्यात अतिक्रमण करण्यात आलेले होते. या ठिकाणी तीन ते चार वर्षांपूर्वी पाण्यात बुडून एका मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली होती; मात्र पुन्हा अतिक्रमण करण्यात आले होते. हे अतिक्रमण जलसंपदा विभागाने काढून कारवाई केली.