Bharat Taxi Inauguration Pudhari
पुणे

Bharat Taxi Expansion: मुंबई-पुण्यानंतर आता कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, नाशिकमध्येही भारत टॅक्सी!

अमित शहा यांची घोषणा; सहकाराच्या माध्यमातून टॅक्सीचालकांना मिळणार व्यवसायाची मालकी, नफाही थेट बँक खात्यात

पुढारी वृत्तसेवा

वडगाव मावळ: मुंबई आणि पुण्यानंतर लवकरच कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि नाशिक येथेही भारत टॅक्सी प्रकल्प सुरू करण्यात येणार असून, भविष्यात हा प्रकल्प संपूर्ण देशभर विस्तारण्याचा विश्वास केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला.

तळेगाव दाभाडेमध्ये भारत टॅक्सी सहकारी संस्थेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार केंद्रीय सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री माधुरी मिसाळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून विविध टॅक्सी कंपन्या त्यांच्यासाठी काम करणाऱ्या चालक बंधू-भगिनींचे आर्थिक शोषण करत आहेत. चालकांच्या कष्टाचा योग्य मोबदला त्यांना मिळत नाही. ही परिस्थिती बदलण्यासाठी सहकाराच्या माध्यमातून भारत टॅक्सीचा अभिनव विचार पुढे आणण्यात आला आहे. आजपर्यंत ज्यांना केवळ ड्रायव्हर म्हणून ओळखले जात होते, ते आता स्वतःच्या व्यवसायाचे मालक बनतील.

भारत टॅक्सीचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक पद्धतीने चालणार असून, या माध्यमातून मिळणारा नफा कोणत्याही कमिशनशिवाय थेट चालकांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. मुंबईमध्ये भारत टॅक्सी सुरू झाली असून, रविवारी पुण्यात या प्रकल्पाचा शुभारंभ झाला आहे. त्यानंतर कोल्हापूर, सोलापूर, नागपूर आणि नाशिकमध्येही सेवा सुरू करण्यात येईल. भविष्यात देशातील सर्व प्रमुख शहरांमध्ये भारत टॅक्सीचे जाळे निर्माण होईल, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही या सहकार तत्त्वावरील प्रकल्पाचे महत्त्व अधोरेखित केले. भारत टॅक्सीमुळे चालकांना स्वतःच्या व्यवसायात मालकी हक्क मिळणार असून, हजारो चालक कुटुंबांना आर्थिक स्थैर्य आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT