भामा आसखेड: खेड तालुक्यातील कोये ते धामणे यादरम्यान रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. रस्त्याच्या साईडपट्ट्या मुरूम टाकून भरण्याऐवजी चक्क माती टाकून भरल्या जात आहेत. या रस्त्यासाठी जवळपास 5 कोटींचा निधी मिळाला आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)कडून धामणे फाटा ते कोये, कोहिंडे फाटा ते कडूसगाव, कडूसगाव ते किवळे, भोसे ते वडगाव घेनंद आणि किवळे ते आंबेठाण या पाच रस्त्यांची कामे मंजूर झाली आहेत. रस्त्यांच्या कामासाठी जवळपास 45 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. धामणे फाटा ते कोयेया दरम्यान पूर्वीच्या डांबरीकरण असलेल्या 1 किमी 800 मीटर लांबीच्या रस्त्यावर सिमेंट काँक्रिटीकरण काम सुरू आहे. यासाठी जवळपास पाच कोटींचा निधी देण्यात आला आहे.
पीएमआरडीए विभागाचे अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराला मिळावे, यासाठी अन्य ठेकेदारांच्या कमी दराने असलेल्या निविदा निकाली काढल्याची चर्चा आहे. संबंधित ठेकेदाराच्या कामांबाबत अनेक गावच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पूर्वीचा डांबरीकरण रस्ता न खोदता ठेकेदाराने त्याच रस्त्यावर काँक्रिटीकरणाचे काम केले. रस्त्याच्या साईडपट्ट्या मुरूम टाकून भरण्याऐवजी चक्क रस्त्याच्या गटारातील माती काढून भरल्या आहेत.
रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला आम्ही मुरूम टाकून साईडपट्ट्या भरा असे सांगितले. परंतु, रस्त्याच्या कडेची माती काढून साईडपट्ट्या भरल्या जात आहेत. रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे कोयेतील सामाजिक कार्यकर्ते पप्पू राळे यांनी सांगितले.
माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी रस्त्याचे कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. परंतु, या रस्त्याचे काम दर्जाहीन असल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग््रेासचे अध्यक्ष जयसिंग दरेकर यांनी केला.