Flood Accident Pudhari
पुणे

Bhama Asakhad River Flood: भामा आसखेडमध्ये पूराचा तडाखा; दुचाकीसह व्यक्ती वाहून गेला, शोधमोहीम सुरू

खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे भामा नदीला पूर; शेलू–कुरकुंडी पुलावर दुर्घटना, प्रशासनाकडून शोधकार्य सुरू

पुढारी वृत्तसेवा

भामा आसखेड: खेड तालुक्यात मुसळधार पावसामुळे ओढे - नाले दुथडी भरून वाहत असताना शेलू - कुरकुंडी गावच्या भामा नदीवर असलेल्या पुलावरून दुचाकीसह एक व्यक्ती पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना सोमवारी (दि.६) सकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान घडली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कडूस गावातील डांगले शिवार परिसरातील रहिवासी अमोल डांगले हे एमआयडीसी क्षेत्रातील एका कंपनीत कामाला असून नाईट शिफ्ट संपवून दुचाकीवरून घरी परतत होते.शेलू स्मशानभूमी जवळून जात असताना ओढ्याच्या पाण्याचा मोठा लोंढा दुचाकीवरून जाणाऱ्या डांगले यांच्या अंगावर आल्याने ते भामा नदीच्या पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याची घटना घडली.दुचाकी बंधाऱ्याला अडकली असून डांगले व्यक्तीचा शोध घेण्याचे कार्य सुरू आहे.

घटनेनंतर त्यांची दुचाकी पुलाखालील पाण्याच्या मोरीमध्ये अडकलेल्या अवस्थेत आढळून आली. मात्र, अमोल डांगले यांचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नसून ते बेपत्ता आहेत. घटनास्थळी स्थानिक ग्रामस्थ, पोलीस, महसूल प्रशासन आणि बचाव पथकांकडून त्यांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, पुलावरून पाण्याचा मोठा प्रवाह सुरू असल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने शेलू-कुरकुंडी नदीपुलावरील रस्ता पुढील आदेशापर्यंत वाहतुकीसाठी बंद केला आहे. नागरिकांनी या मार्गाचा वापर टाळावा तसेच पाण्याखालून जाणाऱ्या पुलांवरून वाहने घेऊन जाण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून अमोल डांगले यांचा शोध लागावा यासाठी प्रशासन प्रयत्न करीत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT