पुणे: मोबाईलमध्ये गर्क असलेली मुले त्यापासून दूर जाऊन नाट्य स्पर्धेच्या माध्यमातून स्वत:ला व्यक्त करीत आहेत. त्यांना दिलेली भूमिका उत्तम रितीने सादर करीत असतानाच सहजीवन, इतरांशी जुळवून घेण्याची सवय यातून ते उत्तम नागरिक म्हणून घडतील, असे मत महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या कलावर्धिनीचे अध्यक्ष डॉ. दिलीप शेठ यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्रीय कलोपासक आणि नाट्यसंस्कार कला अकादमीतर्फे भालबा केळकर नाटिका स्पर्धेचा पारितोषिक वितरण कार्यक्रम गुरुवारी (दि. १५) भरत नाट्यमंदिर येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी डॉ. शेठ बोलत होते. महाराष्ट्रीय कलोपासकचे उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी, नाट्य संस्कार कला अकादमीचे अध्यक्ष प्रकाश पारखी, मकरंद केळकर, स्पर्धेचे परीक्षक अरविंद सीतापुरे, राजश्री राजवाडे-काळे, वंदना गरगटे उपस्थित होते.
पारितोषिक वितरणाच्या पूर्वी स्पर्धेतील विजेत्या नाटिकांचे सादरीकरण झाले. विद्यार्थ्यांनी पारितोषिक स्वीकारताच एकच जल्लोष करीत आनंद व्यक्त केला. प्रकाश पारखी म्हणाले, मुलांना आनंद मिळावा म्हणून भालबा केळकर नाटिका स्पर्धा सुरू करण्यात आली.
या स्पर्धांमधून मुलांचा व्यक्तिमत्व विकास होत असून त्यांना व्यक्त होण्याचे साधन उपलब्ध होत आहे. निकालपत्राचे वाचन ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई यांनी केले तर अवंती लोहकरे यांनी सूत्रसंचालन केले. अभिजित देशपांडे यांनी आभार मानले.
मुलांमधील चमक आणि कौशल्य फुलविण्याचे कार्य जसे भालबा केळकर नाटिका स्पर्धेच्या माध्यमातून होत आहे त्याचप्रमाणे त्यांचा व्यक्तिमत्व विकासही घडत आहे. स्पर्धेत असणारी शिस्त मुलांची उत्तम जडणघडण करीत त्यांना आयुष्याच्या प्रत्येक क्षणी भान ठेवण्याचे शिक्षण आणि संस्कारांची शिदोरी देईल, असे डॉ. शेठ म्हणाले.