भरत मल्लाव
भिगवण: भारतातील चित्रबलाक (पेंटेड स्टॉर्क) आणि इतर जलपक्ष्यांच्या विणीच्या हंगामासाठी महत्त्वाचे मानले जाणारे भादलवाडी (ता. इंदापूर) तलावातील सारंगगार सध्या गंभीर संकटात सापडले आहे. आधीच विविध कारणांनी धोक्यात आलेल्या या पक्षी आश्रयस्थानास आता माती उपसा आणि त्यातून होणाऱ्या वृक्षतोडीचा मोठा फटका बसत आहे.
भादलवाडी तलाव परिसरातील काटेरी वृक्षांवर चित्रबलाक, राखी बगळा, पाणकावळा, लहान पांढरा बगळा, गायबगळा, काळ्या डोक्याचा अवाक, चमचा, टिटवी, तुतवार, जांभळी पाणकोंबडी आदी अनेक पक्षी प्रजाती मोठ्या संख्येने वास्तव्य करतात. जवळपास ५०० हून अधिक घरटी या परिसरात आढळून आली असून, पाणथळ जागा, दलदलीचा परिसर आणि मोकळी जमीन यामुळे पक्ष्यांसाठी हे सुरक्षित अधिवास मानले जाते. आता हे जागतिक महत्त्वाचे आश्रयस्थान इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असल्याची भीती पक्षीप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांकडून व्यक्त होत आहे.
भादलवाडी तलावातील ही पक्षी वसाहत देशातील सर्वात मोठ्या चित्रबलाक वसाहतींपैकी एक असल्याचे दै. 'पुढारी'च्या वृत्तमालिकेतून सुमारे १५ वर्षांपूर्वी प्रकाशात आले होते. त्यानंतर या परिसराच्या संरक्षणासाठी प्रयत्नही करण्यात आले. मात्र, माती व वाळू उपसा करणाऱ्या घटकांकडून यापूर्वीही या वसाहतीला आग लावून नुकसान करण्याचे प्रकार घडल्याचा आरोप स्थानिक पर्यावरणप्रेमींनी केला आहे. त्यावेळी संबंधित यंत्रणांनी प्रभावी हस्तक्षेप न केल्याने या आश्रयस्थानाचे नुकसान वाढत गेले.
तरीही उरलेल्या वृक्षांवर चित्रबलाक आणि अन्य पक्षी आजही दरवर्षी विणीचा हंगाम पूर्ण करतात. मात्र, सध्या माती उपशाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप होत आहे. उत्खननासाठी वापरण्यात येणाऱ्या यंत्रसामग्रीमुळे पक्ष्यांच्या अधिवासालाच धोका निर्माण झाला असून, उरलेली झाडेही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या भागात सुरू असलेल्या वृक्षतोडीला वेळीच आळा घातला नाही, तर आगामी काळात चित्रबलाकांसह अनेक पक्ष्यांची ही वसाहत कायमची नष्ट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागांनी तातडीने हस्तक्षेप करून या महत्त्वपूर्ण पक्षी आश्रयस्थानाचे संरक्षण करावे, अशी मागणी नागरिक, पक्षीप्रेमी आणि पर्यावरण अभ्यासकांकडून होत आहे.
दै. 'पुढारी'ने उलगडले होते देशातील मोठ्या वसाहतीचे अस्तित्व
भादलवाडी येथील ब्रिटिशकालीन तलाव परिसरात चित्रबलाक पक्ष्यांची देशातील सर्वात मोठ्या वसाहतींपैकी एक वसाहत असल्याचा शोध सुमारे १५ वर्षांपूर्वी दै. 'पुढारी'च्या वृत्तांकनातून समोर आला होता. विशेष म्हणजे, या पक्ष्यांची नोंद आंतरराष्ट्रीय वन्यजीव संस्थेच्या 'रेड डाटा बुक'मध्ये करण्यात आली आहे. त्यानंतर ईला फाउंडेशनच्या माध्यमातून चित्रबलाक आणि इतर पक्ष्यांच्या जीवनचक्राचा अभ्यास करण्यासाठी भारतात प्रथमच मोठ्या प्रमाणावर रिंगिंग (पक्ष्यांना ओळख पटविणारे क्रमांकित कडे लावणे) करण्यात आले होते. त्यामुळे भादलवाडीचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले होते.