पुणे : कुठे अयोध्येतील श्री राम मंदिराची प्रतिकृती, तर कुठे बंगाली पद्धतीची सजावट... पारंपरिक वेशभूषेत बंगाली समाजबांधवांनी घेतलेले देवीचे दर्शन अन् बंगाली प्रथा-परंपरेनुसार होणारे धार्मिक उपक्रम... जोडीला बंगाली कलाकारांनी सादर केलेले कार्यक्रम... असे चैतन्यपूर्ण वातावरण बंगाली दुर्गोत्सवानिमित्त पाहायला मिळत आहे. (Latest Pune News)
शनिवारी (दि. 27) बंगाली दुर्गोत्सवाला सुरुवात झाली आणि रविवारी (दि. 28) दुर्गोत्सवाचा उत्साह सगळीकडे दिसून आला. सायंकाळी झालेल्या दुर्गापूजेत अन् धार्मिक उपक्रमात समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. खडकी-रेंजहिल्स येथील पुणे काली बारी मंदिर असो वा काँग्रेस भवन येथील दुर्गोत्सव... पुण्यात ठिकठिकाणी चैतन्याने दुर्गोत्सव साजरा केला जात असून, येथे बंगाली संस्कृती-परंपरेचे दर्शन घडत आहे.
पुण्यामध्ये मोठ्या संख्येने बंगाली समाजबांधव वास्तव्यास आहेत. त्यामुळे मंदिरांसह विविध संस्थांकडून शहर आणि उपनगरात दुर्गोत्सव उत्साहात साजरा केला जातो. यंदाही विविध ठिकाणची मंदिरे आणि संस्थांनी आयोजित केलेल्या दुर्गोत्सवात आनंदी वातावरण रंगले आहे. मंदिरांमध्येही आकर्षक सजावट केली असून, बांधव दर्शनासाठी गर्दी करीत आहेत. सायंकाळी रंगणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमातही त्यांचा सहभाग पाहायला मिळत आहे.
संस्थांनी आयोजिलेल्या दुर्गोत्सवात यानिमित्ताने दुर्गापूजा झाल्यानंतर काही नृत्याचे, गायनाचे कार्यक्रम रंगत असून, त्यातही बंगाली कलासंस्कृतीची झलक पाहायला मिळत आहे. तसेच, बंगाली संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांना दाद मिळत आहे. येथे बंगाली खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही लावण्यात आले असून, पुणेकर गर्दी करीत आहे.
खडकी-रेंजहिल्स येथील पुणे काली बारी मंदिरातही उत्सवाला आनंदाने, उत्साहाने सुरुवात झाली असून, समाजबांधव मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत. याविषयी अनुप दत्ता म्हणाले, यंदा दुर्गोत्सवासाठी आम्ही अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती तयार केली आहे. दुर्गोत्सवाला सुरुवात झाली आहे. दुर्गोत्सवात बंंगाली संस्कृती अन् परंपरेचे दर्शन घडविणारे सांस्कृतिक कार्यक्रमही रंगत आहेत. बंगाली कलाकार कलेचे सादरीकरण करीत आहेत.
बांगीय संस्कृती संसद पुणेच्या वतीने काँग्रेस भवन येथे बंगाली दुर्गोत्सव दरवर्षीप्रमाणे यंदाही उत्साहात साजरा करण्यात येत आहे. याविषयी अरुण चट्टोपाध्याय म्हणाले, रविवारपासून (दि. 28) दुर्गोत्सवाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. सायंकाळी दुर्गापूजा झाल्यावर पहिल्याच दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमही
आयोजित केला होता. बांधवांनी देवीचे दर्शन घेतले तसेच बंगाली पद्धतीच्या खाद्यपदार्थांसह संस्कृतीही जाणून घेतली. बंगाली पद्धतीची सजावट, विद्युतरोषणाईसह विविध भागांत बंगाली संस्कृती, परंपरेचे दर्शन 8खडकी-रेंजहिल्स येथील पुणे काली बारी मंदिरात देवीच्या दर्शनासाठी बंगाली समाजबांधव गर्दी करीत आहेत.