पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : चोरी करताना पाहिल्याच्या कारणावरून सुरक्षारक्षकाला तलवारीने तसेच, हाताने मारहाण करण्यात आली. ही घटना रविवारी (दि. 23) रात्री पावणेबाराच्या सुमारास पिंपरी येथे घडली. या प्रकरणी सुखदेव राजेंद्र मोरे (45, रा. पिंपरी) यांनी पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पोलिसांनी उज्ज्वल विनोद लव्हे (21) याला अटक केली. तसेच, गौरव वाल्मीकी (25), राज वाल्मीकी (18, तिघे रा. पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उज्ज्वल आणि गौरव हे स्टील चोरी करत असताना फिर्यादी यांनी पाहिले. दरम्यान, काही वेळाने ते दोन भावांमधील भांडण सोडवण्यासाठी गेले होते. तेथे आलेल्या आरोपी उज्ज्वल याने फिर्यादी यांच्याकडे खुन्नस देऊन पाहिले.
त्या वेळी फिर्यादी म्हणाले की, मी तुला आणि गौरवला चोरी करताना पाहिले आहे, त्यामुळे चिडलेल्या उज्ज्वल यांनी शिवीगाळ केली. तसेच, तेथे आलेल्या आरोपी गौरव याने तलवारीने सुखदेव यांच्या हातावर वार केले. तसेच, आरोपी राज यानेदेखील सुखदेव यांना धक्काबुक्की करीत मारहाण केली.
याच्या परस्परविरोधी उज्ज्वल विनोद लव्हे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सुखदेव मोरे आणि त्यांचा मुलगा कुमार मोरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उज्ज्वल विनोद लव्हे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, सुखदेव मोरे यांनी तू माझे नाव का घेतले, असे म्हणत उज्ज्वल यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. तसेच, त्यांचा मुलगा कुमार याने देखील लोखंडी हातोडा उज्ज्वल यांना मारून जखमी केले. दोन्ही गुन्ह्याचा तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.
हेही वाचा :