पुणे: पहाटेच्या वेळी घरात शिरलेल्या चौघा चोरट्यांनी एका ज्येष्ठ महिलेला तलवारीने धाक दाखवत मारहाण करून 16 तोळे सोने लुटले. चोरट्यांनी महिलेच्या घरात शिरण्यापूर्वी शेजारी राहणार्या लोकांच्या घराच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या होत्या, तसेच घरातील बल्ब देखील काढून ठेवले होते. त्यामुळे महिलेने आरडाओरडा केला, तरी त्यांच्या मदतीला कोणी धावू शकले नाही.
याप्रकरणी कमल विश्वंभर डोईफोडे (वय 70) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी चौघा चोरट्यांच्या विरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार शनिवारी (दि. 24) पहाटे अडीचच्या सुमारास थेऊर फाटा आंबेकर मळा येथे घडला आहे. फिर्यादी ज्येष्ठ महिला मुंबई येथील राहणार्या आहेत. (Latest Pune News)
त्यांचे थेऊर फाटा येथील आंबेकर मळ्यात फार्महाऊस आहे. अधूनमधून त्या तेथे येत असतात. शुक्रवारी रात्री फिर्यादी फार्महाऊसवर मुक्कामी होत्या. रात्री फिर्यादी आणि त्यांच्याकडे काम करणारी एक मुलगी अशा दोघी घरात झोपल्या होत्या. पहाटे अडीचच्या सुमारास घरातील स्वयंपाकघराच्या खिडकीचे ग्रील तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला.
चोरट्यांनी या वेळी त्यांच्या परिसरात राहणार्या लोकांच्या घरांच्या कड्या बाहेरून लावून घेतल्या होत्या. तसेच फिर्यादींच्या घरातील बल्बदेखील काढून टाकला होता. त्यामुळे घरात अंधार होता. चोरट्यांनी महिलेला उठवून मारहाण केली. त्यांना तलवारीने धाक दाखवून त्यांच्या हातातील बांगड्या, गळ्यातील सोन्याच्या बांगड्या आणि घरातील कपाटातील 16 तोळे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावले.
महिलेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला; परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. हा प्रकार घडल्यानंतर पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती देण्यात आली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट सहा आणि लोणी काळभोर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी फिर्यादी महिलेने पोलिसांना सांगितले की, चोरट्यांनी आपल्या तोंडाला रूमाल बांधले होते. तसेच ते हिंदीत बोलत होते. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी सांगितले.