पुणे

पिंपरी : पावसाळ्यात वीज यंत्रणेपासून राहा सावध!

अमृता चौगुले

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : उन्हाच्या तडाख्यानंतर आता सर्वांना प्रतीक्षा असलेल्या पावसाला सुरवात झाली आहे. पावसाळ्यात विद्युत अपघाताचा धोका अधिक असतो. त्यामुळे घरगुती व सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहणे आवश्यक आहे. त्याबाबत आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. महावितरणने येत्या 26 जून ते 2 जुलै 2023 पर्यंत राष्ट्रीय वीजसुरक्षा सप्ताहानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यात काय काळजी घ्यायला हवी, याबाबतची माहिती महावितरणचे जनसंपर्क अधिकारी निशिकांत राऊत यांनी दिली.

उपाययोजनांवर हवा भर

वीजमीटरपासून घरामध्ये केलेल्या जुनाट वायरिंगची स्थिती योग्य असल्याची खात्री अधिकृत परवानाधारक कंत्राटदाराकडून करून घ्यावी. वीजजोडणीसाठी लागणारे साहित्य आय.एस.आय. प्रमाणित असावे. सर्व विद्युत उपकरणांचे अर्थींग योग्य असल्याची खबरदारी घ्यावी. तसेच मिक्सर, हिटर, गिझर, वातानुकूलित यंत्र, फ्रिज आदी उपकरणांसाठी थ्रीपिन सॉकेटचाच वापर करावा.

सार्वजनिक वीजयंत्रणेपासून सावध राहा

अतिवृष्टीमुळे, वादळाने तुटलेल्या किंवा झुकलेल्या वीजतारा, खांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पीलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे कोणत्याही परिस्थितीत दुर्लक्ष करू नये. सावध राहावे. तसेच तुटलेल्या, लोंबकळणार्या वीजतारांना किंवा इतर सार्वजनिक ठिकाणच्या वीजयंत्रणेला हात लावण्याचा किंवा तुटलेल्या तारा हटविण्याचा प्रयत्न करू नये.

खबरदारी गरजेची

पाणी हे विजेचे वाहक असल्याने विद्युत उपकरणांचा पाण्यापासून बचाव करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने खबरदारी घ्यावी. विशेषतः मीटरजवळच्या जागेत पाणी झिरपून जागा ओली होत असल्यास मीटरचे मुख्य स्वीच बंद करावे व महावितरणच्या कार्यालयाशी तात्काळ संपर्क साधावा. विद्युत उपकरणे, स्वीचबोर्ड असलेली भिंत ओली असेल तर भिंतीस किंवा विद्युत उपकरणांना हात लावू नये.

तत्काळ करा वायरिंगची तपासणी

ओल आलेल्या भिंतीला, लोखंडी पत्र्याला, फ्रीज, टिव्ही, संगणक किंवा पाण्याचे नळ, कुलर आदींना हात लावल्यावर झिणझिण्या येत असतील तर वायरिंगची तात्काळ तपासणी करावी. जुनाट व खराब झालेली वायरिंग तत्काळ बदलून घ्यावी.

काय काळजी घ्याल?

विद्युत खांबांना व तणाव तारेला (स्टेवायर) जनावरे बांधू नये. त्यास दूचाकी टेकवून ठेऊ नये. विद्युत खांबांना तार बांधून कपडे वाळत घालू नये. कपडे वाळविण्यासाठी लोखंडी तारांचा वापर टाळावा. घरातील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ॅण्टेना वीजतारांपासून सुरक्षित अंतरावर असावेत. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. लोखंडी पत्र्याच्या घरात राहणार्या नागरिकांनी पावसाळ्यात विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.

तक्रार कोठे कराल?

महावितरणच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजग्राहकांसाठी मध्यवर्ती ग्राहक सेवा केंद्राचे 1912 किंवा 1800-212-3435 किंवा 1800-233-3435 हे टोल फ्री क्रमांक 24 तास उपलब्ध आहेत. वीजसेवेविषयक सर्व प्रकारची तक्रार दाखल करता येते. सोबतच अतिवृष्टी किंवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणांची माहिती देण्याची देखील सोय उपलब्ध आहे, असे निशिकांत राऊत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT