हिंगोली : पळसोना येथे तुंबळ हाणामारी; १० जखमी, ३६ जणांवर गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली : पळसोना येथे तुंबळ हाणामारी; १० जखमी, ३६ जणांवर गुन्हा दाखल

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील पळसोना येथे ग्रामपंचायतच्यावतीने सुरू असलेल्या नाली बांधकामाच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीत १० जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून ३६ जणांवर बासंबा पोलिस ठाण्यात आज (रविवार) पहाटे गुन्हा दाखल झाले आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने धरपकड मोहिम सुरु करून १४ जणांना ताब्यात घेतले आहे.

तालुक्यातील पळसोना येथे ग्रामपंचायतीच्या वतीने नालीचे बांधकाम केले जात आहे. मात्र या नालीच्या बांधकामावरून तसेच नालीचे पाणी शेतात सोडण्याच्या कारणावरून दोन गटात वाद सुरु झाला होता. शाब्दिक चकमकीनंतर वाद वाढत गेल्याने शनिवारी रात्री तुंबळ हाणामारीला सुरवात झाली. यामध्ये काठ्या, कुऱ्हाडीचा सर्रास वापर करण्यात आला. तसेच एकमेकांवर दगडफेकही करण्यात आली. या घटनेमध्ये गावातील एका गटातील रमेश जाधव, निलेश आडे, सावित्रीबाई जाधव, आनंदा राठोड तर दुसऱ्या गटातील रुपाली राठोड, विष्णू राठोड, पंढरीनाथ राठोड, दशरथ राठोड, प्रदीप राठोड, कृष्णा चव्हाण, सुरतराम राठोड हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस अधिक्षक जी.श्रीधर, अप्पर पोलिस अधिक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपाधिक्षक प्रशांत देशपांडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक विलास चवळी, उपनिरीक्षक मदन गव्हाणे, जमादार खंडेराव नरोटे यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी सुरतराम राठोड यांच्या तक्रारीवरून दत्तराव जाधव, पप्पू जाधव, रमेश जाधव, पांडुरंग जाधव, नितेश जाधव, सुधीर राठोड, ज्ञानेश्‍वर जाधव, बंडू राठोड, अशोक जाधव, लक्ष्मण राठोड, रामा राठोड, संतोष आडे, कृष्णा राठोड, आनंदा राठोड, मारोती जाधव, रामा जाधव यांच्या विरुध्द बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

या प्रकरणामध्ये दत्ता जाधव यांच्या तक्रारीवरून सुरतराम राठोड, दयाराम राठोड, गजानन राठोड, इंद्रचंद राठोड, पंढरीनाथ राठोड, विष्णू राठोड, प्रदीप राठोड, कृष्णा चव्हाण, मांगीलाल राठोड, प्रद्यु्म्न राठोड, प्रेमदास राठोड, नंदु राठोड, संतोष राठोड, वसंता राठोड, विश्‍वनाथ चव्हाण, रविनाथ चव्हाण, नितेश राठोड, अभिषेक चव्हाण यांच्यासह दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी १० जणांना ताब्यात घेतले आहे.

हेही वाचा :  

Back to top button