पुणे

काळजी घ्या ! विषाणू वाढीसाठी पोषक वातावरण; उन्हाळ्यामध्ये खोकला, डोकेदुखीचा ’ताप’

Laxman Dhenge

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शहरात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दिवस-रात्रीच्या कमाल आणि किमान तापमानातील फरकामुळे विषाणूंच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. श्वसनसंस्थेच्या आजारांसह सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप या फ्लूसद़ृश लक्षणांनी डोके वर काढले आहे. दर वर्षीच्या तुलनेत यंदा उन्हाळा जास्त प्रमाणात जाणवत आहे. दिवसाचे तापमान 36-37 अंश सेल्सिअसपर्यंत वाढत आहे. त्यामुळे विविध आजारांनाही आमंत्रण मिळत आहे.

थकवा, डोकेदुखी, चक्कर येणे, हात-पाय दुखणे असे त्रास होणार्‍या रुग्णांचे दवाखान्यांमधील प्रमाण वाढल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदविले आहे. जनरल फिजिशियन डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले, यंदा सर्दी, खोकला, ताप फ्लूसदृश लक्षणांमध्ये वाढ झाली आहे. ताप तीन-चार दिवसांमध्ये कमी होत असला तरी खोकला दोन-तीन आठवडे किंवा काही रुग्णांमध्ये एक महिन्यापर्यंत कायम राहत आहे. औषधांनी फरक पडत नसल्याचेही निदर्शनास येत आहे. अशा वेळी औषधांसह पुरेशी विश्रांती आणि हलका आहार घेणे आवश्यक आहे.

आरोग्य कसे जपावे?

  • आवश्यक काम असेल तरच उन्हात जावे
  • फिक्कट रंगाचे सैलसर कपडे घालावेत
  • दिवसातून तीन-चार लिटर पाणी प्यावे
  • ताक, लिंबू सरबत, कोकम सरबत यांचे सेवन करावे
  • संसर्ग झालेल्यांच्या संपर्कात राहू नये, विश्रांती घ्यावी
  • त्रास झाल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार करावेत

तापमानामध्ये वाढ झाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, चक्कर येणे, हातपाय दुखणे, थकवा येणे, डोळे लाल होणे, असा त्रास उन्हात काम करणारे, प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार यांच्यामध्ये जास्त पाहायला मिळत आहे. उन्हाळ्यात कमी पाणी प्यायल्याने मूत्रमार्गाचा संसर्ग, किडनी स्टोन यांचे रुग्ण वाढले आहेत. त्याचबरोबर अतिनील किरणांच्या मार्‍यामुळे त्वचेवर रॅश येणे, त्वचा काळी पडणे, डोळे लाल होणे, खाज सुटणे, असा त्रासही वाढला आहे.

– डॉ. अविनाश भोंडवे, जनरल फिजिशियन

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT