Bay of Bengal Cloud Pollution Pudhari
पुणे

Bay of Bengal Cloud Pollution: बंगालच्या उपसागरातील प्रदूषित ढगांमध्ये पाण्याचे प्रमाण २० टक्के, बर्फाचे प्रमाण ४३ टक्क्यांनी अधिक!

एरोसोलमुळे पावसाच्या निर्मितीला विलंब; पुण्यातील IITM च्या शास्त्रज्ञांच्या संशोधनातून महत्त्वपूर्ण निरीक्षणे समोर

पुढारी वृत्तसेवा

पुणे: बंगालच्या उपसागरावरील प्रदूषित ढगांमध्ये स्वच्छ ढगांच्या तुलनेत द्रवरूप पाण्याचे प्रमाण २० टक्के, तर बर्फातील पाण्याचे प्रमाण तब्बल ४३ टक्के अधिक आढळले आहे. वातावरणातील सूक्ष्म कणांच्या (एरोसोल) वाढत्या प्रमाणामुळे ढगांमधील सूक्ष्मभौतिक प्रक्रिया बदलत असून, पावसाच्या निर्मितीला विलंब होत असल्याची निरीक्षणे हवामानतज्ज्ञांनी नोंदवली आहेत.

पृथ्वी विज्ञान मंत्रालयांतर्गत येणाऱ्या पुण्यातील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रोलॉजी या संस्थेतील हवामानशास्त्रज्ञ सचिन पताडे, केदार तहसीलदार, अपर्णा मानप्पिल्ली, सोनाली शेटे, गायत्री कुलकर्णी, नीलम मलाप, पी. मुरुगवेल आणि थारा प्रभाकरन यांनी हा शोधनिबंध सादर केला. तो ऑक्टोबर २०२६ मध्ये ॲटमॉसफेअरिक एन्व्हाॅयर्मेंट या शोधपत्रिकेत नुकताच प्रसिद्ध झाला. त्यांतील निरीक्षणे महत्त्वाची आहेत.

लहान थेंबांची टक्कर मंदावली

बंगालच्या उपसागरावरील खोल संवहनी ढगांचा अभ्यास करताना संशोधकांना प्रदूषित सागरी सीमास्तरामध्ये ढग संघटन केंद्रकांची सांद्रता प्रतिघन सेंटीमीटर एक हजारपेक्षा अधिक आढळली. खंडीय भागातून वाहून आलेल्या सूक्ष्म द्रवरूप किंवा घनरूप कणांमुळे (एरोसोल) ही सांद्रता वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.

एरोसोलचे प्रमाण वाढल्याने ढगांमध्ये लहान पाण्याचे थेंब मोठ्या संख्येने तयार झाले. त्यामुळे थेंबांची टक्कर आणि एकत्रीकरणाची प्रक्रिया मंदावून उष्ण पावसाच्या निर्मितीला विलंब होतो आहे.

शास्त्रज्ञांची निरीक्षणे

  • या ढगांमध्ये मात्र बर्फनिर्मितीच्या प्रक्रिया अधिक सक्रिय झाल्या.

  • बर्फाचे कण आणि दुय्यम बर्फनिर्मिती यांचा पर्जन्यनिर्मितीत महत्त्वाचा सहभाग असल्याचे संशोधनातून समोर आले.

  • एरोसोलचा वाढलेला भार उष्ण पावसाच्या प्रक्रियांना दडपतो, तर मिश्र-अवस्था आणि बर्फ-अवस्थेतील प्रक्रियांना बळकटी देतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT