महापालिकेची प्रभागरचना नुकतीच जाहीर झाल्याने माजी नगरसेवकांसह इच्छुकांची आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. गेल्या निवडणुकीत या प्रभागात भाजपचे चारही नगरसेवक निवडून आले होते. मात्र, या निवडणुकीत मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्षाने जोरदार तयार सुरू केली आहे. परंतु, भाजपशी लढत देताना यासह इतर पक्षांची कसोटी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. (Latest Pune News)
लोकसभेपाठोपाठ विधानसभा निवडणुकीत या प्रभागातील मतदारांनी भाजपच्या उमेदवारांना साथ दिली होती. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत या प्रभागावर कोणाचे वर्चस्व असणार? की भाजप आपल्या जागा कायम राखणार? याची उत्सुकता लागली आहे. या प्रभागात भाजपच्या इच्छुकांची संख्या जास्त असल्याने तिकीट वाटप करताना भाजपला कसरत करावी लागणार आहे. अजून तरी महायुती, महाआघाडी निवडणूक कशी लढविणार, याबाबत संदिग्धता आहे. मात्र, सर्वच पक्षांतील इच्छुकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि तीर्थयात्रांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहचण्यास सुरुवात केली आहे.
या प्रभागात भाजपकडून माजी नगरसेवक किरण दगडे पाटील, दिलीप वेडेपाटील, डॉ. श्रध्दा प्रभुणे आणि अल्पना वरपे हेच पुन्हा प्रमुख दावेदार आहेत. याशिवाय गणेश वरपे, राजाभाऊ जोरी, राजेश्री मुरकुटे, श्वेता तोरडमल, वैभव मुरकुटे, गोरख दगडे पाटील, राजेश कुलकर्णी, धनंजय दगडे, राजाभाऊ गोरडे, बाळा टेमकर, सचीन पवार हेसुद्धा निवडणुकीची तयारी करीत आहेत. बावधन बुद्रुक या गावचा आता समावेश झाल्याने येथील लोकनियुक्त सरपंच पीयूषा दगडे पाटील ह्यासुद्धा भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. या सर्वच इच्छुकांकडून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. मात्र, पक्षाकडून तिकीट कुणाला मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसकडून बंडू केमसे यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे. मात्र, केमसे हे नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातून लढणार की सर्वसाधारण जागेवरून लढणार, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांच्याव्यतिरिक्त विजय डाकले, कुणाल वेडे पाटील, मिलिंद वालवडकर, सुहास उभे हे सर्वसाधारण जागेसाठी इच्छुक आहेत.
काँग्रेसकडून किशोर मारणे, किरण आढगडे, नीलेश वाघमारे हे इच्छुक आहेत. प्रभागात पक्षाची ताकद कमी असून, नवीन भाग जोडल्याने या प्रभागात काँग्रेसला मोठी मेहनत घ्यावी लागणार आहे. शिवसेनेकडून किरण मारणे, सीमा चिकणे, मीनल धनवडे, अनिराज कोराडे यांची नावे चर्चेत आहेत. मनसेकडून किशोर शिंदे या निवडणुकीत प्रभाग १० । मधून इच्छुक नसल्याचे सांगितले जात आहे. यामुळे पक्षाला नवीन मोठा चेहरा शोधण्याची गरज आहे. मनसेकडून पुष्पा कनोजिया, रमेश उभे, सुभाष आमले, सीताराम तोडपाटील इच्छुक आहेत. आद आदमी पक्षाकडून कुणाल घारे, आरती करंजावणे यांची नावे चर्चेत आहेत.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, बहुजन समाज पक्ष, वंचित बहुजन आघाडीसह इतर पक्षांच्या उमेदवारांचीही जुळवाजुळव सुरू आहे. युती, आघाडी झाल्यास किंवा आरक्षणात बदल झाल्यास मोठे फेरबदल होऊ शकतात. महापालिका निवडणुकीत युती झाली नाही, तर काही इच्छुक पक्षांतर करतील, अशी चर्चा प्रभागात सुरू आहे. तर, काही जण तिकिटाच्या अंदाजावर इतर पक्षांमध्ये प्रवेशाच्या तयारीत आहेत. त्यामुळे त्याचाही परिणाम प्रभागातील राजकीय परिस्थितीवर होण्याची शक्यता आहे.
वावधन-भुसारी कॉलनी या प्रभाग क्र. १० ची एकूण लोकसंख्या ८४ हजार १२७ इतकी आहे. या प्रभागात महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेल्या बावधन बुद्रुक या गावचा समावेश आहे. याशिवाय बावधन खुर्द, वेद भवन-कोथरूड डेपो, उजवी व डावी भुसारी कॉलनी, लोकमान्य वसाहत, शास्त्रानगर, परमहसनगर, गुरू गणेशनगर आणि माता सोसायटी असा परिसर आहे. यामुळे प्रभागाचा विस्तार आता सुमारे १२ त १५ किलोमीटर झाल्याने मतदारापर्यंत पोहचताना उमेदवारांची चांगलीच दमछाक होणार आहे.