Money Pudhari
पुणे

Pune BARTI Controversy: बार्टीच्या लोणावळा कार्यशाळेत लाखोंची उधळपट्टी; खासगी रिसॉर्ट खर्चावर चौकशीची मागणी

सरकारी प्रशिक्षणाऐवजी लक्झरी रिसॉर्टमध्ये कार्यशाळा; 20–25 लाख खर्चावर विशेष लेखापरीक्षणाची मागणी

पुढारी वृत्तसेवा

पुणे: डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) च्या वतीने राज्यातील समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी लोणावळ्यातील एका खासगी लक्झरी रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दोनदिवसीय कार्यशाळेत मोठ्या प्रमाणावर शासकीय निधीची उधळपट्टी झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी विशेष लेखापरीक्षण तसेच सखोल चौकशीची मागणी रिपब्लिकन विद्यार्थी सेनेचे प्रदेशाध्यक्ष विवेक बनसोडे यांनी केली आहे.

विवेक बनसोडे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांनुसार, शासनाकडे ‌‘यशदा‌’सारखी स्वतःची प्रशिक्षण संस्था आणि सुविधा उपलब्ध असताना ही कार्यशाळा लोणावळ्यातील आलिशान खासगी रिसॉर्टमध्ये का आयोजित करण्यात आली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. 8 आणि 9 मे रोजी पार पडलेल्या या दोनदिवसीय कार्यशाळेसाठी अंदाजे 20 ते 25 लाख रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

प्रत्यक्षात कार्यक्रमात केवळ काही सादरीकरणे आणि भाषणे झाली असून, एवढ्या मोठ्या खर्चाचे औचित्य काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसेच, रिसॉर्टचे बुकिंग थेट न करता मध्यस्थांमार्फत केल्याने कमिशन व्यवहार झाल्याचा संशयही व्यक्त केला आहे. संबंधित लक्झरी हॉटेलमधील एका खोलीचे भाडे सुमारे 9,600 रुपये असल्याचे सांगितले जात आहे.

बार्टी ही संस्था अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या विविध योजनांसाठी निधी वेळेवर उपलब्ध होत नसताना अधिकाऱ्यांच्या कार्यशाळांवर मोठा खर्च करण्यात येत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी बनसोडे यांनी केली आहे.

बार्टी संस्थेमधील नियुक्त्यांवरही प्रश्नचिन्ह

बार्टी संस्थेमध्ये नियमबाह्य नियुक्त्या, आर्थिक अनियमितता आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे संगनमत होत असल्याचा आरोपही विवेक बनसोडे यांनी केला आहे. या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT