Baramati crime case Pudhari
पुणे

Baramati crime case: बायकोकडूनच दृश्यम स्टाईल खुनाचा प्रयत्न! घरात कट्टा बांधत पतीला गाडण्याचा प्लॅन फसला

हत्येचा कट रचणाऱ्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल

पुढारी वृत्तसेवा

बारामती: अजय देवगण अभिनित ‘दृश्यम’ चित्रपट हा फार गाजला. या चित्रपटाप्रमाणेच आपल्या पतीचा खून करण्याचा एका महिलेचा प्रयत्न फसला. बारामती येथे ही घटना उघडकीस आली असून, याप्रकरणी संबंधित पत्नीविरोधात बारामती शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबतची हकीकत अशी की, कौटुंबिक कारणावरून पतीला औषध देत त्याला बेशुद्ध करत घरातील हाॅलच्या गॅलरीमध्ये कट्टा बांधून कडाप्पा लावत जिवंत गाडण्याचा प्रयत्न पत्नीने केला.

शर्मिला प्रवीण जगताप (वय ३८, रा. इंद्रप्रस्थ सोसायटी, जामदार रोड, बारामती) असे या महिलेचे नाव आहे. याबाबत बारामती शहर पोलिस ठाण्यात प्रकाश कान्होबा जगताप (वय ७१, रा. ढाकाळे, ता. बारामती) यांनी फिर्याद दिली.

शुक्रवार (दि. ३० जुलै) रात्री साडे अकरा ते शनिवार (दि. १ ऑगस्ट) सकाळी यादरम्यान जामदार रोडवरील इंद्रप्रस्थ सोसायटीतील राहत्या फ्लॅटमध्ये ही घटना घडली. फिर्यादीचा मुलगा प्रवीण (वय ४१) व त्यांची पत्नी शर्मिला यांच्यात कौटुंबिक वाद होते. या वादाच्या कारणावरून पत्नीने पतीला जीवे मारण्याच्या उद्देशाने घरातच पुरून टाकण्याचा प्लॅन आखला.

त्यासाठी हाॅलच्या गॅलरीत चौकोनी कट्टा बांधून घेतला. पतीला कसले तरी औषध देत बेशुद्ध केले. त्यांना बेशुद्धावस्थेत त्या कट्ट्याच्या आतमध्ये झोपवून तो कट्टा कडाप्पा फरशीने बंद करण्याचा प्रयत्न करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला. दरम्यान, अज्ञाताने ही माहिती डायल ११२ द्वारे पोलिसांपर्यंत पोहोचवली. शहर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ घटनास्थळी धाव घेत बेशुद्धावस्थेतील प्रवीण यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT