Water  Pudhari
पुणे

Baramati Regular Water Supply: बारामतीकरांना दिलासा; शुक्रवारपासून शहरात पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरू

वीर धरणातील पाणीसाठा सुधारला, नीरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू; दोन दिवसाआड पाण्याच्या संकटातून नागरिकांची सुटका

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती शहरात टंचाईच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाआड पाणीपुरवठा केला जात होता; मात्र धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे वीर धरणाची परिस्थिती सुधारल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निरा डावा कालव्याचे आर्वतन सोडण्याच्या सूचना जलसंपदा विभागाला दिल्या होत्या. त्यानुसार आवर्तन सुरू झाल्याने आता शुक्रवार (दि. १०) पासून बारामती शहरात नियमित पाणीपुरवठा सुरू केला जाणार आहे, अशी माहिती नगराध्यक्ष सचिन सातव व मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी दिली.

कालव्याचे आवर्तन अनेक दिवस बंद होते. त्यामुळे तलावातील उपलब्ध पाणीसाठा जपून वापरावा लागत होता. परिणामी, पालिकेने दोन दिवसाआड पाणी पुरवठ्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता नागरिकांना नियमित पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या कठीण काळात बारामतीकरांनी पाण्याचा अत्यंत जबाबदारीने आणि काटकसरीने वापर करून नगरपरिषदेला मोलाचे सहकार्य केले.

दरम्यान, संत जगदगुरू श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अखंड पाणीपुरवठा होणे आवश्यक असल्याने नगराध्यक्षांसह पाणीपुरवठा सभापती मनीषा समीर चव्हाण यांनी उपमुख्यमंत्र्यांकडे कालव्याचे आवर्तन सुरू करण्याची मागणी केली होती. त्यांनी तत्काळ जलसंपदा विभागाला सूचना दिल्या.

त्यामुळे सोमवारी (दि. ६) कालव्याला पाणी सोडण्यात आले. बुधवारी (दि. ८) ते शहरात पोहोचले. त्यानुसार आता आवश्यक नियोजन पूर्ण करण्यात आले असून, शुक्रवारपासून नियमित पाणीपुरवठा केला जाणार आहे.

टंचाईच्या काळात बारामती नगरपरिषद प्रशासनाने उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन केले. या नियोजनाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि सकारात्मक सहकार्य लाभले. त्यांच्या तातडीच्या पाठपुराव्यामुळे कालव्याचे आवर्तन सुरू झाले आहे. आता शहरातील नागरिकांना पुन्हा नियमित पाणीपुरवठा सुरू करता येत आहे. भविष्यातही नागरिकांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.
सचिन सातव, नगराध्यक्ष, बारामती नगरपरिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT