बारामती: बारामतीतील विद्या प्रतिष्ठामध्ये उभारलेल्या पुतळ्यांसह अन्य वास्तूंचे उदघाटन व विद्या प्रतिष्ठानच्या स्थापना दिनाचा कार्यक्रम येत्या १६ आॅक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचा विचार असल्याची माहिती ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी दिली.
गोविंदबागेत कार्यकर्त्यांशी बोलताना पवार यांनी ही माहिती दिली. विद्या प्रतिष्ठानमध्ये गौतम बुद्धांसह अन्य महापुरुषांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडविणारे प्रेरणास्थान उभे राहत आहे. या वास्तूचे तसेच स्थापना दिन कार्यक्रम पंतप्रधानांच्या उपस्थितीत करण्याचा विचार पवार यांनी बोलून दाखवला. तसे निमंत्रण पंतप्रधान मोदी यांना देण्यात आले आहे.
विद्या प्रतिष्ठानमध्ये उभारलेल्या या वास्तूमध्ये विविध महापुरुषांचे फोटो लावण्यात येणार असून, त्यासाठी उत्तम कलाकारांकडून त्यांची चित्रे तयार करून घेण्यात आली आहेत. राजर्षी शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, राजे सयाजीराव गायकवाड, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यशवंतराव चव्हाण आणि शारदाबाई पवार यांना या ठिकाणी प्रेरणास्थान म्हणून स्थान देण्यात येणार आहे. या महापुरुषांनी समाजासाठी केलेले कार्य, त्यांचे विचार, कर्तृत्व आणि योगदान नव्या पिढीपर्यंत पोहोचावे, हा या संकल्पनेमागील उद्देश असल्याचे पवार यांनी सांगितले. या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना आणि विद्यार्थ्यांना या व्यक्तिमत्त्वांच्या कार्याची माहिती मिळावी, यासाठी त्यांच्या जीवनकार्याची माहितीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी देशभर विविध ठिकाणी बारव, विहिरी आणि पाणवठे उभारून जनतेसाठी पाण्याची सुविधा निर्माण केली. त्यांच्या या कार्याचे स्मरण म्हणून जिरायती भागात बारव उभारण्याची कल्पनाही मांडण्यात आली आहे. पाण्याची टंचाई असलेल्या भागात अशा स्वरूपाच्या जलसंधारणाच्या उपाययोजना उभारण्याचा विचार असल्याचे पवार यांनी सांगितले.
दरम्यान, यावेळी महिला कार्यकर्त्यांना अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची माहिती वाचण्यासाठी देण्यात आली होती. त्यावेळी माहिती वाचताना झालेली एक चूक शरद पवार यांच्या निदर्शनास आली. महापुरुषांच्या कार्याची माहिती देताना संदर्भ आणि तपशील अचूक असणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
पंतप्रधानांच्या बारामती भेटीसंबंधी खा. सुप्रिया सुळे पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, पंतप्रधानांना निमंत्रण दिले आहे. कार्यक्रम कसा असेल, तारीख तीच असेल की एखादा दिवस पुढे-मागे होईल, याचा फाॅलोअप आम्ही घेत आहोत. कन्फर्मेशन आले की तुम्हाला कळवले जाईल.