बारामती: बारामती शहर पोलिस व पुणे ग््राामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या धडक कारवाईत शेड्यूल्ड एच प्रवर्गातील 100 टर्मिन इंजेक्शनसह तरुणाला अटक करण्यात आली. गौरव बाळासोा जाधव (वय 24, रा. पवार बंगल्याजवळ, आमराई, बारामती) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह औषध व सौंदर्य प्रसाधने अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
स्थानिक गुन्हे शाखेला याबाबतची माहिती मिळाली होती. शहरातील एमईसीबी कार्यालयाजवळील सेवा रस्त्यावर एक युवक संशयास्पदरीत्या वावरत असून, त्याच्याकडे इंजेक्शनचा साठा आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला. पोलिसांना रस्त्याच्या कडेला ॲक्टिव्हा (एमएच 42 डब्ल्यू 9260) वर एक संशयित तरुण दिसला. त्याला ताब्यात घेतले असता त्याने नाव सांगितले. स्कूटीच्या झडतीत डिकीमध्ये एका खाकी बॉक्समध्ये मेफेन्टर्माईनची तब्बल 100 इंजेक्शन मिळून आली. ही इंजेक्शन नॅप्रोफीन कंपनीची असून, ती मार्च 2026 मध्ये तयार झाल्याचा बॅच त्यावर होता.
जाधवकडे इंजेक्शन खरेदीची कोणतीही वैध बिले, डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन किंवा परवाना मिळून आला नाही. प्राथमिक चौकशीत आरोपी हे इंजेक्शन बॉडी बिल्डिंग, जिममध्ये शरीर क्षमता वाढविणे व शारीरिक ताकद वाढविण्यासाठी प्रतिबाटली सुमारे 500 रुपयांप्रमाणे विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पंचांसमक्ष 33 हजार 400 रुपयांची इंजेक्शन, 50 हजार रुपयांची दुचाकी असा 83 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
औषध निरीक्षक सचिन बुगड यांनी सांगितले की, हे औषध शेड्यूल्ड एच प्रवर्गात मोडते. डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय त्याची विक्री करणे कायद्याने प्रतिबंधित आहे. या औषधाचा वापर कमी रक्तदाबाच्या आजारात होतो. परंतु, शरीर क्षमता वाढविण्यासाठी त्याचा गैरवापर केला जात आहे. पोलिसांकडून आता जाधव याची अधिक चौकशी केली जात आहे. त्यातून इंजेक्शनपुरवठा साखळी, आर्थिक व्यवहार, जीमचे नेटवर्क आदींबाबतची माहिती पुढे येण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अप्पर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.