Baramati Rain Shortage Pudhari
पुणे

Baramati Rain Shortage: बारामतीत खरीप संकटात; सप्टेंबरचे १० दिवस उलटूनही पावसाचा पत्ता नाही

बाजरी, सोयाबीन हातचे जाण्याची भीती

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती तालुक्यात पावसाने तब्बल ४० दिवसांपासून दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरचे दहा दिवस उलटूनही पावसाचा पत्ता नसल्याने शेतकऱ्यांची चिंता दिवसेंदिवस वाढत आहे. बाजरी, सोयाबीनसह अन्य खरीप पिके पाण्याअभावी सुकू लागल्याने उत्पादनावर परिणाम होणार आहे.

तालुक्यातील ओढे-नाले कोरडे पडले असून, विहिरी व बोअरवेलच्या पाणीपातळीतही घट झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे.

गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका आणि वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पावसाअभावी शेतातील पिकांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत असून, शेतकरी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे.

सध्या निरा डावा कालव्याचे आवर्तन सुरू असल्याने कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, तालुक्यातील सर्वच भागांना कालव्याच्या पाण्याचा लाभ मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांची शेती पावसावरच अवलंबून आहे. खरीप पिकांना तारण्यासाठी मोठ्या पावसाची गरज आहे.

पावसाने आणखी काही दिवस ओढ दिल्यास बाजरी, सोयाबीनसह अन्य पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट बघत आहे.

गणेशोत्सवात पावसाची प्रतीक्षा

गणेशोत्सव अवघ्या ४ दिवसांवर आला असतानाही तालुक्यात पावसाचे वातावरण दिसत नसल्याने शेतकरी व नागरिकांची चिंता वाढली आहे. हवामानातील बदल आणि अल निनोच्या प्रभावाची चर्चा होत असताना यंदाच्या पावसाळ्याने बारामतीकरांची चिंतावाढवली आहे. खरीप हंगाम वाचविण्यासाठी दमदार पावसाची आवश्यकता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT