बारामती: बारामती तालुक्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने उन्हाचा कडाका वाढला आहे. दिवसभर कडक ऊन आणि वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, ऐन गणेशोत्सवाच्या काळात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शेतीसाठी पाण्याची टंचाई जाणवू लागली असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
गणेशोत्सवाच्या काळात वातावरणात बदल होऊन पावसाच्या सरी बरसतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. मात्र, पावसाऐवजी उन्हाचा तडाखा वाढल्याचे चित्र तालुक्यात आहे.
सकाळपासूनच उन्हाची तीव्रता जाणवत असून, उकाड्यामुळे नागरिकांची गैरसोय होत आहे. पावसाळ्यात सर्वसाधारणपणे दिसणारे रेनकोट, छत्र्या आता कमी प्रमाणात दिसत असून, नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, गॉगल आणि स्कार्फचा आधार घेतला आहे.
दुचाकीस्वारांकडूनही उन्हापासून संरक्षणासाठी विविध उपाय केले जात आहेत. अचानक वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत आहे.
पावसाळ्याचा कालावधी सुरू असतानाही पावसाने मोठी विश्रांती घेतल्याने बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. अनेकांनी गणपतीला पावसासाठी साकडे घातले आहे. काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर शेतीबरोबरच जनावरांच्या चारा-पाण्याचा प्रश्न अधिक गंभीर होण्याची शक्यता आहे.
शेतीला पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवू लागले
पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने खरीप पिकांना पाण्याची गरज भासत आहे. विहिरी, बोअरवेल आणि उपलब्ध पाणीसाठ्यावर शेती अवलंबून आहे. पाऊस आणखी लांबल्यास पिकांवर त्याचा परिणाम होऊन शेतकरी आर्थिक अडचणीत येणार आहे.
पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. पावसाअभावी हिरवा चारा उपलब्ध होण्यावरही परिणाम होत असून, जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनत आहे. साठवून ठेवलेला चारा संपत चालल्याने आगामी काळात पशुपालकांसमोर मोठे आव्हान उभे राहणार आहे.