बारामती: बारामती तालुक्यात ऐन उन्हाळ्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. विशेषतः ग्रामीण भागातील नागरिक हैराण झाले आहेत. दिवसा वारंवार खंडित होणाऱ्या विजेमुळे नागरिकांना नकोसे केले आहे. बारामती तालुक्यात तापमानाचा पारा 38 अंशांवर आहे. या पार्श्वभूमीवर वीज नसल्याने उकाड्याने घामाघूम होण्याची वेळग्रामस्थांवर आली आहे.
भारनियमन नसतानाही दर अर्ध्या-एक तासाला वीजपुरवठा खंडित होत आहे. विशेष म्हणजे, शहरात काही प्रमाणात पूर्वसूचना दिल्या जात असल्या, तरी ग्रामीण भागात कोणतीही पूर्वसूचना न देता वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने नागरिकांनी तीव नाराजी व्यक्त केली.
सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत ग्रामीण भागात फोर्स लोडशेडिंग सुरू आहे. मात्र, याबाबत अधिकारी स्पष्ट माहिती देण्यास टाळाटाळ करतात. गावागावांतील पिण्याच्या पाण्याच्या योजना विजेवर अवलंबून असल्याने पाणीपुरवठाही विस्कळीत होत आहे.
अधिकारी आणि वायरमनचे मोबाईल बंद असल्याने “वीज कधी येणार?” या साध्या प्रश्नाचे उत्तरही मिळत नाही. वीजपुरवठ्याच्या या अनियमिततेचा फटका लहान व्यावसायिकांनाही बसत आहे. ग्रामीण भागातील दुकानदारांनी विक्रीसाठी ठेवलेले आईस्क्रीम, शीतपेये व दुग्धजन्य पदार्थ खराब होत असल्याने त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
पक्ष, संघटनांची उदासीनता
ग्रामीण भागातील विजेच्या गंभीर प्रश्नावर स्थानिक पदाधिकारी, राजकीय नेते आणि विविध संघटना पूर्णपणे निष्क्रिय असल्याचे चित्र आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिक त्रस्त असतानाही या प्रश्नावर कोणत्याही ठोस आंदोलनाची किंवा पाठपुराव्याची भूमिका आत्तापर्यंत घेतली गेली नाही. पूर्वी शेतकरी संघटना व विविध पक्ष-संघटना वीज, पाणी, शेती अशा मूलभूत प्रश्नांवर सातत्याने रस्त्यावर उतरून आंदोलन करीत होत्या. मात्र, सध्या “तेरी भी चूप, मेरी भी चूप” अशी परिस्थिती आहे.