

पुणे: महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. आंबेडकरांचे तत्वज्ञान सर्वांसाठी आहे. त्यांनी तो धडा आपल्याला दिला आहे. तो सर्व लक्षात घेऊन समाजातील प्रत्येकाने पुढे जायला हवे. अंधश्रद्धेपासून दूर राहिल्यास बाबा निर्माण होणार नाहीत, असे मत राष्ट्रवादी कांग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.
महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त मंत्री छगन भुजबळ फुलेवाडा येथे अभिवादनासाठी आले होते. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. एसआयटीला आलेल्या अज्ञात पत्रात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या जीवाला धोका असल्याचा उल्लेख करण्यात आल्याच्या प्रश्नावर त्यांनी सुनेत्रा वहिनींसोंबत आम्ही सगळे जण आहोत.
मुख्यमंत्रीही त्यांना संरक्षण देतील आणि आम्ही कार्यकर्तेही त्यांची काळजी घेऊ असे सांगितले. अनेक क्षेत्रात पुरोगामी आणि प्रतिगामी आहेत. त्यामुळे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांचे कार्यक्रम राबविण्याची गरज आहे.
जेणेकरून प्रतिगामीपणा कमी होईल. राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद जी महिला त्या पदाला योग्य आहे आणि न्याय देणारी आहे त्या महिलेला देण्यात यावे, असेही भुजबळ म्हणाले. हेलिपॅड न दिसल्यामुळे कार पार्किंगमध्ये हेलिकॉप्टर उतरले. त्यामुळे अपघात वगैरे काही नाही. फक्त आम्ही सुरक्षित बाहेर आलो. काळजी करण्याचे कारण नाही, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.
खरातच्या दुष्कृत्यांमध्ये सहभागींवर कारवाई सुरू
एखाद्या व्यक्तीबरोबर फोटो असला म्हणजे तो त्याच्या दुष्कृत्यामध्ये सहभागी होता हे स्पष्ट होत नाही. परंतु, खरातच्या दुष्कृत्यांमध्ये जे सामील आहेत त्यांच्यावर गेल्या सहा महिन्यांपासून मुख्यमंत्री लक्ष ठेवून आहेत. तसेच, त्यांच्यावर कारवाईही सुरू झाली आहे. नाशिक जिल्हा भोंदूबाबांमुळे बदनाम होत आहे. परंतु, पोलिस आणि सरकार कारवाई करत आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिकमध्ये करण्यात येणाऱ्या वृक्षतोडीबद्दल बोलताना कुणीही झाडे न तोडता सगळी कामे करावीत, अशा मताचा मी आहे. नवीन पर्याय उपलब्ध झाल्याशिवाय वृक्षतोड करू नये, असेही भुजबळ यांनी नमूद केले.