बारामती: उपमुख्यमंत्री व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार ह्या सोमवारी (दि. 6) उमेदवारी अर्ज दाखल करणार असतानाच शहरातील प्रशासकीय भवन परिसरातील संरक्षक भिंतींवर लावण्यात आलेल्या एका फलकामुळे बारामतीतील राजकीय वातावरण तापले.या फलकांवर ‘फक्त अजितदादांचे नावच पुरेसे आहे, घातकी तटकरे-पटेलची गरज नाही : समस्त दादाप्रेमी’ असा मजकूर लिहिण्यात आला होता. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.
एकीकडे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ह्या अर्ज दाखल करणार असल्याने त्यासंबंधीची धावपळ बारामतीत सुरू असतानाच या फलकाने तणाव वाढला. पवार यांचे पुत्र जय यांनी अशा गोष्टींना महत्त्व देण्याची गरज नसल्याचे सांगितले, तर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की, माझा स्वभाव सर्वांना माहिती आहे. याबाबत मी बोलत नाही. कोणाची काही पोटदुखी असेल, तर मी काय बोलणार?
मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की, ठरावीक मंडळींनी हे कृत्य केले असेल; पण आज सुनेत्रा पवार यांच्या जीवनातील आव्हानात्मक काळ असताना त्यांच्यासमोर कोणीही असे कृत्य करू नये. आम्ही सगळेच दादाप्रेमी आहोत. त्यांच्या पश्चात कोणाला पटो न पटो, आम्ही सुनेत्रा पवार यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. बारामतीच्या भूमीला अशा गोष्टी शोभा देत नाहीत.