चार जीव गेल्यानंतर बारामतीचे पोलिस अ‍ॅक्शन मोडवर Pudhari
पुणे

Baramati Police: चार जीव गेल्यानंतर बारामतीचे पोलिस अ‍ॅक्शन मोडवर; 14 अवजड वाहने जप्त

सोमवारी (दि. 28) शहर आणि परिसरात ओव्हरलोड अवजड वाहनांवर कारवाई केली.

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामतीत रविवारी (दि. 27) डंपरच्या धडकेत दोन मुलींसह वडिलांचा मृत्यू झाला. या धक्क्याने मुलींच्या आजोबांनीही 24 तासांच्या आतच आपले प्राण सोडले. त्यानंतर बारामती पोलिस अ‍ॅक्शन मोडवर आले आहेत. त्यांनी सोमवारी (दि. 28) शहर आणि परिसरात ओव्हरलोड अवजड वाहनांवर कारवाई केली.

या कारवाईत पोलिसांनी एकूण 14 वाहने जप्त केली आहेत. या सर्व वाहनांवर खटले तयार करून ते प्रादेशिक परिवहन अधिकारी बारामती यांच्याकडे पाठविल्याची माहिती बारामती वाहतूक शाखेचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली. (Latest Pune News)

बारामती परिसरात मोठ्या प्रमाणावर खडी, मुरूम व इतर बांधकाम साहित्याची वाहतूक ट्रकमधून होत असते. मात्र, या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक वजन भरले जाते. या वाहनांमुळे रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, तसेच अपघात होत आहेत. नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करीत ही कारवाई करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

जप्त केलेली वाहने 2 ते 10 टनांपर्यंत ओव्हरलोड आढळून आली आहेत. यामध्ये प्रत्येक वाहनावर मोठा दंड होण्याची शक्यता आहे. सर्व वाहने बारामती वाहतूक शाखेच्या कार्यालयात ठेवण्यात आली आहेत. पोलिस प्रशासनाने सर्व वाहनचालकांना याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच, यापुढेही अशाच प्रकारची कारवाई सातत्याने राबवली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः अपर पोलिस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, विलास नाळे तसेच बारामती वाहतूक शाखेचे सुभाष काळे, प्रदीप काळे, माया निगडे, रूपाली जमदाडे, प्रज्योत चव्हाण, बारामती पोलिस स्टेशनचे ओंकार सीताप, स्वाती काजळे, अजिंक्य कदम यांनी ही कारवाई केली आहे.

ओव्हरलोड वाहने चालविणे म्हणजे केवळ कायद्याचे उल्लंघन नाही, तर इतरांच्या जिवाशी खेळ आहे. सर्व वाहनचालक, वाहनमालक व ठेकेदारांनी जबाबदारीने वागावे. आम्ही कारवाई करीत आहोत ती फक्त कायद्याच्या अंमलबजावणीसाठी नव्हे, तर जनतेच्या सुरक्षेसाठीही आहे.
- चंद्रशेखर यादव, पोलिस निरीक्षक, बारामती वाहतूक शाखा
’गेल्या अनेक महिन्यांपासून बारामती वाहतूक शाखा वाहतुकीचे नियम रुजविण्यासाठी कारवाया करीत आहे. तरीही अपघातात मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण चिंताजनक आहे. याबाबत नागरिकांनी, वाहनचालकांनी सजग राहून वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे.
- गणेश बिरादार, अपर पोलिस अधीक्षक बारामती
काही चालक नियम मोडून ओव्हरलोड वाहने चालवतात. यामुळे शाळेतील विद्यार्थी, वृद्ध, ग्रामस्थांना धोका निर्माण होतो. वाहतुकीत शिस्त आणि सुरक्षितता, यासाठीच मोहीम राबवली जात आहे.
- सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT