ST Bus Pudhari
पुणे

Baramati Phaltan ST Bus Service: अखेर यश! बारामती–फलटण साखरवाडी एसटी बससेवा सुरू

विद्यार्थी, कामगार व प्रवाशांना दिलासा; ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती ते फलटण तालुक्यातील साखरवाडी या दोन महत्त्वाच्या बाजारपेठांना जोडणारी एसटी बससेवा अखेर सुरू झाली. वडगावातील ग््राामस्थांनी ही बस सुरू व्हावी यासाठी मोठा पाठपुरावा बारामती आगाराकडे केला होता. दै. ‌‘पुढारी‌’ने देखील यासंबंधी वृत्त प्रकाशित करत प्रवाशांची गरज अधोरेखित केली होती. अखेर प्रवाशांच्या मागणीला यश आले. या एसटी बसच्या पहिल्या फेरीचे वडगावमध्ये स्वागत करण्यात आले. चालक-वाहकांचा ग््राामस्थांकडून सत्कार करण्यात आला.

वडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते विजय हिरवे, दत्तात्रय गायकवाड यांनी या कामी बारामती आगाराकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. बारामती तालुक्याच्या पश्चिम भागात वडगाव निंबाळकर व फलटण तालुक्यात साखरवाडी महत्त्वाच्या बाजारपेठेची मोठी गावे आहेत. शिक्षणानिमित्त फलटण तालुक्यातून अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी बारामती तालुक्यात शारदानगर, माळेगाव, सोमेश्वरनगर आदी परिसरात येतात.

यापूर्वी फलटण आगाराकडून या मार्गावर वडगावपर्यंत बस सुरू होती. परंतु, त्यांनी ती बंद केली. परिणामी विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. पालकांना स्वतः शिक्षणासाठी मुलांना घेऊन जाणे खर्चीक पडत होते. पालकांवर आर्थिक भुर्दंड आणि दिवसभर कामाचा खोळंबा होत होता. साखरवाडी, सुरवडी येथील कंपनीमध्ये बारामती तालुक्यातील अनेक कामगार कार्यरत आहेत. त्यांचीही गैरसोय होत होती.

सामाजिक कार्यकर्त्यांनी एसटी प्रशासनाकडे बस सेवा सुरू व्हावी, अशी मागणी सातत्याने केली होती. याबाबत परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देण्यात आले होते. त्यानंतर परिवहनमंत्र्यांनी बस सुरू करण्याचे आदेश दिले होते. याबाबतचे पत्र विजय हिरवे, दत्तात्रेय गायकवाड यांना देण्यात आले. तातडीने बारामती आगारात याची माहिती देऊन बससेवा सुरू करण्याची विनंती केली. अखेर सोमवारी (दि. 15) मुक्कामी बस सेवा सुरू झाली.

बारामती येथून सायंकाळी 7 वाजता ही बस सुटेल. वडगाव निंबाळकर येथून साखरवाडी येथे मुक्कामी राहील. पुन्हा सकाळी 6.30 वाजता बारामतीच्या दिशेने निघेल. दररोज एक फेरी असे नियोजन आहे. बसच्या पहिल्या फेरीचे चालक ए. एस. पिंगळे, वाहक एन. पी. कुंभार यांचा ग््राामस्थांनी सत्कार केला. या वेळी आबा भोसले, जितेंद्र पवार, नीलेश आगम, विलास बनकर, हनुमंत लोणकर, महेंद्र माने, नानासाहेब मदने, उदय आगम, संतोष भोसले, दिलीप हिरवे यांच्यासह प्रवाशी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT