बारामती नगरपरिषदेकडे 12 हजारांपेक्षा अधिक मूर्तिसंकलन; पाच टन निर्माल्य जमा Pudhari
पुणे

Baramati News: बारामती नगरपरिषदेकडे 12 हजारांपेक्षा अधिक मूर्तिसंकलन; पाच टन निर्माल्य जमा

; अधिकारी-कर्मचार्‍यांच्या परिश्रमाचे बारामतीकरांकडून कौतुक

पुढारी वृत्तसेवा

बारामती: गणेशोत्सवामध्ये गणरायाला निरोप देताना अनंत चतुदर्शीदिनी बारामती नगरपरिषदेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाचे बारामतीकरांनी कौतुक केले. सुमारे 350 हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी शनिवारी (दि. 6) भल्या सकाळपासून ते अगदी रविवारच्या पहाटेपर्यंत अविरतपणे राबले.

नगरपरिषदेने 36 ठिकाणी उभारलेल्या कृत्रिम कुंडामध्ये एकूण 12 हजार 216 मूर्तींचे संकलन झाले. त्यामध्ये घरगुती व सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केलेल्या मूर्तींचा समावेश आहे. बारामती रोटरी क्लबकडून नगरपरिषदेला निर्माल्यसंकलनासाठी भव्य असे कुंड देण्यात आले होते. या प्रत्येक ठिकाणी नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी तैनात होते. त्यांनी चोखपणे आपले कर्तव्य पार पडले.  (Latest Pune News)

अगदी जेवणासाठीसुद्धा त्यांनी सुटी न घेता पालिकेने दिलेल्या डब्यातून सेवेच्या ठिकाणीच जेवण आटोपले. यासंबंधी पालिकेचे आरोग्य निरीक्षक राजेंद्र सोनवणे यांच्या व्हायरल झालेल्या फोटोचे बारामतीकरांनी कौतुक केले. नगरपरिषदेच्या सर्वच अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी विसर्जन मिरवणुकीत घेतलेल्या कष्टाचे बारामतीकरांनी तोंडभरून कौतुक केले.

गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावर पालिकेकडून स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. येणार्‍या मंडळांचे मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी स्वागत केले. पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी स्वागत कक्षात उपस्थित होते.

दहा दिवस गणरायाला अर्पण केलेले फुलांचे हार, दूर्वा, नारळ व इतर साहित्य असे पाच टन निर्माल्य पालिकेने जमा केले. शनिवारी दिवसभर तसेच रात्री उशिरापर्यंत पालिकेची टीम त्यासाठी तैनात होती. मुख्याधिकारी पंकज भुसे स्वतः सर्व ठिकाणचा दिवसभर आढावा घेत होते.

गणेशभक्तांना विसर्जनात कोणताही अडथळा येऊ नये, यासाठी अधिकारी आणि कर्मचार्‍यांसोबत ते स्वतः सर्व ठिकाणी भेटीही देत होते. शिवाय आवश्यक त्या सूचना करीत होते. पालिकेच्या अधिकारी आणि कर्मचार्‍यांनी विसर्जन मिरवणुकीनंतर शहर चकाचक राहील याची दक्षता घेतली.

कालव्याच्या ठिकाणी बंदोबस्त

पर्यावरणपूरक पद्धतीने गणरायाचे विसर्जन व्हावे, यासाठी नगरपरिषदेने पुढाकार घेतला. सध्या निरा डावा कालव्याचे आवर्तन बंद असले, तरी कालव्यात साठलेल्या पाण्यात कोणीही विसर्जन करू नये, यासाठी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कुठेही निर्माल्य टाकू न देता ते निर्माल्यसंकलन कुंडातच जमा केले जावे, यासाठी विशेष प्रयत्न झाल्याचे दिसून आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT