Land Dispute Fight: जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी; शिक्रापूर पोलिस ठाण्यात 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हा
Two groups clash over land dispute
तळेगाव ढमढेरे: जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे जमिनीच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. याप्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दोन गटांतील महिलांसह 14 जणांवर परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याप्रकरणी विलास यशवंत उमाप (वय 57) व संभाजी तानाजी उमाप (वय 46, दोघेही रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर) यांनी परस्परविरोधी फिर्यादी दिल्या आहेत. त्यानुसार दोन्ही गटांतील संभाजी तानाजी उमाप, तानाजी किसन उमाप, शुभम तानाजी उमाप, पोपट किसन उमाप, संगीता संभाजी उमाप, विलास यशवंत उमाप, आनंदा हौशीराम उमाप, महेंद्र गुलाब उमाप, अजित गुलाब उमाप, यश आनंदा उमाप, शिल्पा आनंद उमाप, सुमन गुलाब उमाप, सपना महेश उमाप, ललिता विलास उमाप (सर्व रा. जातेगाव बुद्रुक, ता. शिरूर, जि. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. (Latest Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जातेगाव येथे विलास उमाप व संभाजी उमाप यांची वडिलोपार्जित जमीन आहे. विलास हे त्यांच्या कुटुंबीयांसह त्यांच्या जमिनीची खासगी मोजणी करून जमिनीला चिरे लावत होते. या वेळी संभाजी हे त्यांच्या कुटुंबीयांसह तेथे आले. त्यांनी जमीन मोजणीस विरोध केल्याने दोन्ही गटांत वाद झाला. त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांना शिवीगाळ, दमदाटी करत हाणामारी केली. पोलिस हवालदार बापू हाडगळे व विश्वांबर वाघमारे हे पुढील तपास करत आहेत.

