Baramati Nagar Parishad result 2025
बारामती : बारामती नगर परिषद निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार ६ विरोधी उमेदवार निवडून आले आहेत. पक्षांतर्गत नाराजीचा अजित पवार गटाला फटका बसला असून या निकालावर अजित पवारांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'जिल्हा कोणाच्या मागे उभा आहे', असं त्यांनी सांगितलं आहे.
निवडून आलेल्या ६ उमेदवारांपैकी १ शरद पवार गट, १ बसपा तर सर्वाधिक ४ उमेदवार हे अपक्ष आहेत. अपक्ष म्हणून यशपाल पोटे, वनिता सातकर, मनिषा बनकर, निलेश इंगुले निवडून आले आहेत. शरद पवार गटातून आरती शेंडगे, तर बहुजन समाज पार्टीतून संघमित्रा चौधरी निवडून आल्या आहेत.
बारामतीतील 20 प्रभागांपैकी काही प्रभागांमध्ये अपक्षांनी कडवे आव्हान उभे केले होते. त्यामुळे दगाफटका होऊ नये यासाठी मोठ्या पक्षांना तारेवरची कसरत करावी लागत होती. दुसरीकडे अजित पवारांनीही बालेकिल्ल्यासाठी कंबर कसली होती. अजित पवरांनी बेरजेचे राजकारण करत गेल्या निवडणुकीत अजित पवारांच्या पॅनेलविरोधात निवडून आलेल्यांनाच राष्ट्रवादीच्या पॅनेलमधून संधी दिली होती. यामुळे अजित पवारांच्या पक्षातच नाराजी पसरली होती आणि या नाराजीचा फटका त्यांना बसल्याचे समजते.
अजित पवारांची प्रतिक्रिया व्हायरल
अजित पवारांनी या निकालावर दिलेली प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. बारामतीत उमेदवारांच्या पराभवावर माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले, जिल्हा कोणाच्या मागे उभा आहे बघ. पुणे जिल्ह्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने गड राखला आहे. पुणे जिल्ह्यातील १४ नगर परिषदेपैकी ९ ठिकाणी राष्ट्रवादी विजयी झाली आहे.