बारामती : बारामती नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाच्या अखत्यारीत 17 शाळांचा कारभार येतो. परंतु, गेल्या काही वर्षांत शिक्षण मंडळाला पूर्णवेळ प्रशासन अधिकारी मिळत नसल्याची स्थिती आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेचे कामकाज चालते. परंतु, त्यांच्याच बारामतीत शिक्षण मंडळाला पूर्णवेळ प्रशासन अधिकारी मिळत नसल्याची स्थिती आहे. आता नव्याने दिलेल्या जबाबदारीमध्ये जिल्हा परिषदेच्या योजना अधिकारी स्वाती शेळके (पुजारी) यांच्याकडे बारामतीचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.(Latest Pune News)
नगरपरिषद शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी जून महिन्यात निवृत्त झाले. त्यानंतर गेले तीन महिने प्रशासन अधिकारी पालिकेच्या शिक्षण मंडळाला मिळालेला नव्हता. मध्यंतरी पगार बिले व इतर कारणांच्या अडचणींमुळे पालिकेच्या करसंकलन अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला. त्यानंतर आता विभागीय शिक्षण उपसंचालकांकडून हा कार्यभार पुजारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
बारामती नगरपरिषद शिक्षण मंडळाच्या 17 शाळा आहेत. पूर्वी नगरपरिषदेकडे आठ शाळा होत्या. त्यात नऊ शाळा नव्याने पालिका क्षेत्रात आल्या आहेत. या शाळांमध्ये एकूण 3231 विद्यार्थी शिक्षण घेतात. त्यात 1672 मुली, तर 1559 मुलांचा समावेश आहे. गोरगरिबांची मुले नगरपरिषद शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत.
येथील प्रशासकीय कारभार मोठा आहे. नगरपरिषद इमारतीत शिक्षण विभागाला विस्तारित जागा, स्वतंत्र कक्ष देण्यात आले आहेत. येथे पूर्णवेळ अधिकारी गरजेचा असताना गेल्या काही वर्षांत सातत्याने अतिरिक्त कार्यभार दिला जात आहे. पालकांनी यासंबंधी नाराजी व्यक्त केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे पूर्णवेळ अधिकारी उपलब्ध करून दिला, तर शाळांचा दर्जा सुधारू शकतो, असे मत पालकांनी व्यक्त केले.
विद्यार्थ्यांना न्याय मिळणार?
आता नगरपरिषद शिक्षण मंडळाचा कार्यभार स्वाती शेळके (पुजारी) यांच्याकडे सोपविला आहे. मुळात पुजारी यांच्याकडे पुण्यात योजना अधिकारी म्हणून जबाबदारी आहे. मात्र, त्यांना शंभर किलोमीटर अंतरावरील बारामतीतील अतिरिक्त पदभार दिला आहे. याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. दोन जबाबदाऱ्या असताना त्या येथील पदाला कसा न्याय देणार?असाही प्रश्न निर्माण झाला आहे.रिक्त जागेचा पदभार पुन्हा अतिरिक्त अधिकाऱ्यांच्या हाती