बारामती एमआयडीसी ते खानवटे रस्ता धोकादायक; साइडपट्ट्या न भरल्याने अपघाताची शक्यता  Pudhari
पुणे

बारामती एमआयडीसी ते खानवटे रस्ता धोकादायक; साइडपट्ट्या न भरल्याने अपघाताची शक्यता

28 किमीच्या अंतरात अनेक ठिकाणी साइडपट्ट्या भरलेल्या नाहीत.

पुढारी वृत्तसेवा

भिगवण: बारामती एमआयडीसी ते खानवटे हा 28 कि.मी.चा राज्यमार्ग तब्बल 270 कोटी खर्च करून सिमेंट काँक्रिटचा करण्यात आला. रस्ता तयार होऊन तीन महिने उलटले आहेत, तरीही जागोजागी साइडपट्ट्या भरल्या नाहीत, राडारोडा तसाच आहे, लोखंडी सळया बाहेर तशाच असल्याने अपघाताची शक्यता आहे.

या रस्त्याचे काम एका बड्या ठेकेदाराकडे आहे. तो मनमानीपणे काम करीत असल्याच्या तक्रारी शेतकरी व ग्रामस्थ करीत असले तरी त्याने तक्रारीकडे दुर्लक्ष केले आहे. 28 किमीच्या अंतरात अनेक ठिकाणी साइडपट्ट्या भरलेल्या नाहीत. (Latest Pune News)

रस्ता सिमेंटचा झाल्याने वाहनांचा वेग कमालीचा वाढला आहे. त्यात साइडपट्ट्या न भरल्याने अपघाताची शक्यता आहे. काही ठिकाणी साइडपट्ट्या व रस्ता यांच्यात दीड ते दोन फुटांचे अंतर आहे. त्यामुळे वाहने ओव्हरटेक करताना अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. साइडपट्ट्या न भरल्याने रस्त्यासाठी वापरलेल्या लोखंडी सळया देखील उघड्या पडल्या आहेत.

त्यामुळे अपघात झाल्यास या सळयांमुळे मोठे नुकसान होऊ शकते. ठेकेदाराने मूळ रस्त्याचे काम होताच आपला बाडबिस्तरा आवरला आहे. एवढा मोठा रास्ता होऊनही सामान्य नागरिक, शेतकरी, वाहनचालक यांना मात्र जीव मुठीत धरूनच प्रवास करण्याची वेळ आली आहे.

साइडपट्ट्या भरल्या नसल्याने अनेक व्यावसायिकांची देखील तारांबळ उडाली आहे. पूर्वी रोजगाराचे व उपजीविकेचे साधन म्हणून रस्त्याच्या कडेला छोटे-मोठे व्यवसाय सुरू होते. मात्र, साइडपट्ट्या भरल्या नसल्याने वाहने थांबणे अवघड झाले आहे.

त्याचा परिणाम छोट्या व्यावसायिकांवर झाला आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने सर्व साइडपट्ट्या भरून घ्याव्यात. तसेच, अनेक ठिकाणी तसाच ठेवलेला राडारोडा हटवावा, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT