Land Fraud Pudhari
पुणे

Baramati Khedkar Family Plot Fraud: खेडकर कुटुंबीयांवर प्लॉट व्यवहारात फसवणूक, मारहाणीचा आरोप; पोलीस अधीक्षकांकडे तक्रार

वाघळवाडीतील जमीन व्यवहारातून १ कोटी २५ लाख रुपये घेतल्याचा अमित दराडे यांचा दावा; जिवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील प्लॉटच्या खरेदी-विक्री व्यवहारातून फसवणूक करून आपल्याला वादग्रस्त खेडकर कुटुंबीयांनी डांबून ठेवून मारहाण केली. यास जिवे मारण्याची धमकी देण्यात आली, असा गंभीर आरोप भिगवण येथील अमित मुरलीधर दराडे यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी पुणे ग्रामीणच्या पोलिस अधीक्षकांकडे लेखी अर्ज देऊन संबंधितांविरुद्ध कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे.

दराडे यांनी १४ ऑक्टोबर रोजी दिलेल्या अर्जानुसार, दिलीप कोंडिबा खेडकर आणि मनोरमा खेडकर यांनी वाघळवाडी येथील रस्त्यालगतचा प्लॉट विक्रीसाठी मदत करण्याची विनंती केली होती. त्यानुसार दराडे यांनी माळेगाव येथील ओळखीच्या सूर्यवंशी यांना माहिती दिली. त्यानंतर पुण्यातील बाणेर येथील खेडकर यांच्या घरी चर्चा झाली.

तक्रारीनुसार, १४ गुंठे क्षेत्राच्या प्लॉटचा प्रतिगुंठा १० लाख ७५ हजार रुपये दराने व्यवहार ठरला. व्यवहाराची एकूण किंमत १ कोटी ५० लाख ५० हजार रुपये असल्याचे अर्जात नमूद आहे. त्यापैकी २५ हजार रुपये इसारापोटी देण्यात आले, तर उर्वरित रक्कम १२ ऑक्टोबर रोजी बारामती येथे खरेदीखत करताना देण्याचे ठरले होते.

१२ ऑक्टोबर रोजी दराडे आणि खरेदीदार जगदाळे बारामतीतील दुय्यम निबंधक कार्यालयात गेले असताना मनोरमा खेडकर यांचा फोन आला. बारामती क्लब परिसरातील लॉजवर थांबलो असल्याचे सांगून व्यवहार पूर्ण करण्यासाठी तेथे बोलावण्यात आल्याचे दराडे यांनी अर्जात म्हटले आहे. तेथे चर्चेनंतर पैसे मोजण्यासाठी मशिन आणण्यास सांगण्यात आले. त्यानंतर सुमारे १ कोटी २५ लाख ५० हजार रुपये मनोरमा खेडकर, दिलीप खेडकर आणि त्यांचे व्यवस्थापक बाळराजे खेडकर यांनी ताब्यात घेतल्याचा आरोप आहे.

यानंतर एका खोलीत बोलावून कागदपत्रांवरून दबाव टाकण्यात आला, असे त्यांनी म्हटले आहे. संबंधित प्लॉटबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे सांगून संपूर्ण रकमेचा व्यवहार नाकारण्यास किंवा केवळ १८ लाख रुपयांचे कागदपत्रे करण्यास सांगण्यात आल्याचा आरोपही अर्जात आहे. रकमेवरून वाद झाल्यानंतर आपल्याला इच्छेविरुद्ध थांबवून ठेवण्यात आले, मारहाण करण्यात आली आणि धमकावण्यात आले, असा दावा दराडे यांनी या तक्रारीत केला आहे. दरम्यान, खेडकर कुटुंबीय यापूर्वी विविध कारणांनी चर्चेत आले आहे. बारामती तालुक्यातील वाघळवाडी येथील जमीनप्रकरणी आता थेट पोलीस अधीक्षकांकडे तक्रार अर्ज करण्यात आल्याने पोलीस याप्रकरणी काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT