Parth Pawar Pudhari
पुणे

Parth Pawar Baramati Project Visit: बारामतीतील कन्हेरी वनउद्यान व शिवसृष्टी प्रकल्पांची पार्थ पवारांकडून पाहणी

दर्जेदार व वेळेत काम पूर्ण करण्याच्या सूचना; पर्यटन विकासाला गती देण्यावर भर

पुढारी वृत्तसेवा

काटेवाडी: दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांचे पुत्र युवा नेते पार्थ पवार यांनी बारामतीतील अजितदादांच्या ‌‘ड्रीम प्रोजेक्ट‌’मध्ये लक्ष घातले आहे. तालुक्यातील कन्हेरी येथील वनउद्यानास तसेच शिवसृष्टी प्रकल्पास भेट देऊन सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी केली. यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांकडून कामांच्या प्रगतीबाबत सविस्तर माहिती घेतली. कन्हेरी वनउद्यानातील उर्वरित कामे दर्जेदार, टिकाऊ आणि ठरलेल्या वेळेत पूर्ण व्हावीत तसेच पर्यटन विकासाला गती मिळण्यासाठी कन्हेरी वनउद्यान व शिवसृष्टी याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचना दिल्या आहेत.

वनउद्यानातील साठवण तलाव, नर्सरी, तसेच ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी अंतर्गत झुलता पूल, झिप लाईन, बोटिंग, रॉकेट इंजेक्टर, 360 डिग््राी सायकल, मेल्ट डाऊन आदी पूर्ण झालेल्या सर्व कामांची माहिती पार्थ पवार यांनी घेतली. नागरिक व पर्यटकांसाठी सुरक्षितता, सुविधा आणि देखभाल याबाबतही त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

यानंतर पार्थ पवार यांनी शिवसृष्टी या ऐतिहासिक थीम पार्क परिसरातील कालव्याशेजारील रस्त्याची पाहणी केली. शिवसृष्टीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनप्रवासाचे दर्शन घडवणाऱ्या अनेक भव्य प्रतिकृती उभारण्यात येणार आहेत. यामध्ये शिवकाळातील सदर व आग््राा दरबार, शिवकालीन बाजारपेठा व राज्यसभा, राजगड प्रवेशद्वाराची प्रतिकृती, शिवकालीन आरमार, माहितीपट, प्रत्यक्ष युद्धाचा अनुभव, तसेच प्राण्यांसाठी विशेष व्यवस्था आदींचा समावेश असणार आहे.

शिवसृष्टीमुळे आगामी काळात पर्यटकांना इतिहासाची ओळख होऊन प्रेरणा मिळणार असून, वनउद्यान व ऐतिहासिक शिवसृष्टी थीम पार्कमुळे बारामतीचे सांस्कृतिक व पर्यटन महत्त्व अधिक वाढणार आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पांची कामे उच्च दर्जाची, नियोजनबद्ध आणि वेळेत पूर्ण करावीत, अशा स्पष्ट सूचना पार्थ पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

पार्थ पवारांनी दाखवली आपली कार्यशैली

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर ‌’दादांच्या पावलावर पाऊल ठेवत‌’ पार्थ पवार यांनी वनउद्यान व शिवसृष्टी परिसरात भेट देऊन कामांची प्रत्यक्ष पाहणी करत आपली कार्यशैली दाखवली, अशी चर्चा नागरिकांमध्ये ऐकायला मिळत आहे. या पाहणीमुळे प्रशासनालाही कामांना गती देण्यासाठी बळ मिळाले असून, बारामतीच्या विकासात नव्या टप्प्याची सुरुवात झाल्याचे चित्र आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT