Job Fraud Pudhari
पुणे

Baramati Government Job Fraud: सरकारी नोकरीच्या आमिषाने ११७ जणांची ३.७३ कोटींची फसवणूक; दोघांविरुद्ध बारामतीत गुन्हा

आरोग्य, रेल्वे, वन, जलसंपदा आदी विभागांत नोकरीचे आश्वासन; बनावट निवड यादी व जॉइनिंग लेटर देत कोट्यवधींची उकळपट्टी

पुढारी वृत्तसेवा

बारामती: राज्य शासनाच्या आणि केंद्राच्या विविध विभागांमध्ये सरकारी नोकरी लावतो, असे सांगत ११७ जणांची ३.७३ कोटींची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांविरोधात बारामती तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुबायू सरकार ऊर्फ राणा (रा. वर्धमान, कोलकाता, पश्चिम बंगाल) आणि प्रमोद भगवान गुरव (रा. ज्योतिर्लिंग हौसिंग सोसायटी, सेक्टर नंबर ६, घणसोली, नवी मुंबई; मूळ रा. उंद, ता. कराड, जि. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात रणजित हरीभाऊ मोढे (रा. सूर्यनगरी, बारामती) यांनी फिर्याद दिली.

फिर्यादीची २०२० पासून गुरव याच्याशी ओळख होती. त्याने त्याचा मित्र राणा याच्याशी त्यांची ओळख करून दिली. 'राणा हा महाराष्ट्रातील आरोग्य, वन, जलसंपदा, समाजकल्याण, ओएनजीसी मुंबई, रेल्वे आदी विभागांत नोकरी लावतो, तुमच्याकडे कोणाला नोकरी हवी असेल तर सांगा,' असे गुरवने सांगितले. अनेक युवकांना सरकारी नोकरी मिळवून दिल्याचेही त्याने सांगितले.

त्यानंतर २०२३-२४ मधील विविध भरती प्रक्रियेसाठी उमेदवार गोळा करण्यात आले. उमेदवारांकडून अर्ज भरून घेत प्रत्येकाकडून लाखो रुपयांची आगाऊ रक्कम स्वीकारण्यात आली. महाराष्ट्र शासनाच्या विभागांतील नोकरीसाठी प्रत्येकी सुमारे पाच लाख, तर रेल्वे नोकरीसाठी सहा लाख रुपये लागतील, असे सांगण्यात आले. फिर्यादीने त्यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांच्यासह अन्य ११७ जणांनी या दोघांच्या सांगण्यावरून नोकऱ्यांसाठी अर्ज भरले.

त्यापोटी या दोघांनी सर्वांकडून मिळून विविध टप्प्यांत रोख व ऑनलाइन स्वरूपात एकूण ३ कोटी ७३ लाख स्वीकारले. त्यानंतर उमेदवारांना शासकीय विभागांच्या बनावट निवड याद्या, खोटे शिक्के असलेले जॉयनिंग लेटर देण्यात आले. काहींना प्रशिक्षणासाठी पाठविल्याचे भासवून प्रत्यक्षात कोणालाही सरकारी नोकरी न देता आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT