बारामती : न्यायालयीन अपील दाखल झाल्यामुळे बारामती नगर परिषदेची निवडणूक पुढे गेली आहे. राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकांनी यांनी याबाबतचे पत्रक जारी केले आहे.
त्यांच्या पत्रानुसार आता जिल्हाधिकारी ४ डिसेंबर रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील. तदनंतर नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याची अंतिम तारीख १० डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत असेल.
आवश्यकतेप्रमाणे निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा तसेच अंतिमरीत्या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्याचा दिनांक १९ डिसेंबर हा असेल. तर आवश्यकता भासल्यास मतदान २० डिसेंबर रोजी पार पडेल. २१ डिसेंबर रोजी मतमोजणी व निकाल पार पडणार आहे.
निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे बारामतीत नगराध्यक्ष पदासह सदस्य पदाचे सर्व उमेदवार संभ्रमात पडले आहेत. केवळ दोन जागांबाबत न्यायालयीन प्रक्रिया निर्माण झाली होती. या दोन जागांचे मतदान नंतर घेतले जाणार होते. नगराध्यक्षपदासह अन्य जागांवर मतदान प्रक्रिया २ डिसेंबर रोजी पार पडणार होती.
अशा स्थितीत आयोगाने हा निर्णय दिल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासह सर्व प्रक्रिया नव्याने पार पडणार असल्याने बिनविरोध झालेल्या जागांबाबत नेमके काय होणार याचेही कोडे पडले आहे.