बारामती: बारामती तालुका सहकारी दूध उत्पादक संघ नेहमीच सभासद, शेतकऱ्यांच्या हितासाठी कटीबद्ध आहे. संघाने आर्थिक शिस्त जोपासली आहे. संघ 25 कोटी रुपये खर्च करून नंदन दूध पावडर व पशुखाद्य प्रकल्प उभारणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
संघाची 48 वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी (दि. 28) पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व संघाचे अध्यक्ष संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी ते बोलत होते. राष्ट्रवादीचे विविध पदाधिकारी, विविध संस्थांवर काम करणारे पदाधिकारी, संचालक आदी या वेळी उपस्थित होते. (Latest Pune News)
पवार यांनी तालुक्यात सुरू असलेल्या विकासकामांची माहिती दिली. कऱ्हा-निरा जोडप्रकल्प राबवला जाणार असून, त्याचा शेतकऱ्यांना फायदा होईल, असे ते म्हणाले. संघातर्फे राबविल्या जात असलेल्या पशुवैद्यकीय सेवा, प्रशिक्षण, डेअरी विभागामार्फत दिले जाणारे साहित्य, अनुदानावरील बॅग, मका बियाणे आदींमुळे शेतकऱ्यांना फायदा होत असल्याचे ते म्हणाले. गत वर्षात 15.67 लाखाचे अनुदान दिल्याचे ते म्हणाले.
संघाचे उपाध्यक्ष दत्तात्रय वावगे, व्यवस्थापकीय संचालक डॉ. योगेश राणे यांनी स्वागत केले. उपमहाव्यवस्थापक (वित्त व लेखा) अमोल चव्हाण यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले.
दीपावलीनिमित्त 9.63 कोटी रुपये
संघाचे सध्या प्रतिदिन 2.71 लाख लिटर दूध संकलन आहे. 2024-25 या वर्षात पुरवठा केलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर 55 पैसे व प्राथमिक दूध संस्थांना प्रतिलिटर 15 पैसे याप्रमाणे 70 पैसे दूध फरकापोटी 6.92 कोटींची रक्कम, सभासदांना 13 टक्के प्रमाणे 1.11 कोटींचा लाभांश तर संघाच्या कायम कर्मचाऱ्यांना 25 टक्के बोनसपोटी 1.60 कोटी रुपये असे 9.63 कोटी रुपये दीपावलीनिमित्त दिले जाणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष संजय कोकरे यांनी दिली.