पुणे

Baramati bribe case : पाच लाखांची लाच स्वीकारताना पोलीस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

बारामती तालुका पोलीस ठाण्यातील महेश उगले याच्यावर कारवाई

पुढारी वृत्तसेवा

बारामती : तक्रार अर्जावर कारवाई न करण्यासाठी तब्बल सात लाख रुपयांची लाच मागून, त्यातील उर्वरित पाच लाखांची रक्कम स्वीकारताना बारामती तालुका पोलीस ठाण्यातील एका पोलीस हवालदाराला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. महेश अंकुश उगले (वय ३६, रा. विमलनाथ अपार्टमेंट, विजयनगर, बारामती) असे लाचखोर हवालदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या पत्नीने सुरू केलेल्या झुंबा डान्स क्लास आणि जिमच्या कारणावरून स्थानिक नागरिकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तक्रारदार व त्यांच्या पत्नीवर कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी हवालदार महेश उगले याने सात लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी दोन लाख रुपये उगले याने यापूर्वीच स्वीकारल्याचे समोर आले आहे.

उर्वरित रकमेसाठी तगादा लावल्याने तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रीतसर तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने ७ सप्टेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी केली असता, हवालदार उगले याने पाच लाख रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार एसीबीच्या पथकाने मंगळवारी (दि. ८) बारामती शहरातील माळेगाव रस्त्यावरील पीडीसीसी बँकेच्या शाखेजवळ सापळा रचला. दुपारी सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास महेश उगले याने तक्रारदाराकडून पाच लाख रुपयांची रोकड स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला जागीच रंगेहाथ पकडले.

या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा १९८८ मधील कलम ७ अन्वये बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही धडक कारवाई पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष पाटील, पोलीस हवालदार प्रवीण तावरे आणि त्यांच्या पथकाने केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT