पुणे

Baramati Constituency : मतदार घेताहेत एकमेकांच्या भागाचा कानोसा

Laxman Dhenge

 पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये देशात 'हाय व्होल्टेज' अशी चुरशीची लढत होत असून, राज्यात ताकदवान व शक्तिमान असलेल्या दोन्ही पवार कुटुंबांमध्ये ही निवडणूक प्रथमच होत असल्याने राज्यातील नागरिकांबरोबरच खुद्द येथील मतदारांमध्ये या निवडणुकीविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. परिणामी, या मतदारसंघात सर्वत्र राजकीय वातावरण कसं आहे? या उत्सुकतेपोटी तुमच्याकडे निवडणूक वातावरण कसं आहे? या माहितीची दररोज देवाण-घेवाण सध्या बारामती लोकसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.

तसं पाहिलं तर एक-दीड महिन्यापासून बारामती लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. पवार कुटुंबातील सदस्यांमध्येच लढत होईल, अशी चर्चा सुरुवातीपासून सुरू होती, अखेर सुप्रिया सुळे व सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जाहीर झाल्याने ही चर्चा खरी ठरली आहे. त्यामुळे सध्या चालू असलेल्या उन्हाळ्यामध्ये राजकीय तापमानाचा पारा कमालीचा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
देशात नाव असलेल्या शरद पवार व अजित पवार या दोन्ही पवार कुटुंबांनी आजपर्यंत एकही निवडणूक हरलेली नाही. निवडणूक जिंकण्याची कला, तंत्र, मंत्र व सर्व आयुधे या दोघांकडे असल्याने निवडणुकीत काय होईल याचा प्रारंभिक अंदाज ठामपणे बांधणेही सध्या तरी मतदारांबरोबरच राजकीय निरीक्षकांनाही अवघड जात आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला व भोर हे सहा तालुके येतात. या सर्व तालुक्यांमध्ये गावोगावी आठवडे बाजारातून यूट्युब न्यूज चॅनलच्या माध्यमातून नागरिकांच्या प्रतिक्रिया नॉनस्टॉप घेतल्या जात आहेत. त्या प्रतिक्रिया ऐकून मतदार किती हुशार झाला आहे, याची जाणीव राजकीय निरीक्षकांना येत आहे. त्यामुळे गावो-गावच्या नेत्यांनाही आपल्या गावातील, भागातील मतदान कसे होईल याचा अंदाज बांधणेदेखील कठीण झाले आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी प्रारंभापासून नक्की असल्याने त्यांनी एक-दीड महिन्यापासूनच जाहीर प्रचाराला सुरुवात केली आहे.

त्यानंतर तापलेले राजकीय वातावरण बघता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनीही निवडणूक प्रचारास वेगाने सुरुवात केली. तर राजकीय चाणक्य असलेले शरद पवार निवडणुकीत कोणते डाव टाकतात याकडे जनतेचे लक्ष आहे. या निवडणुकीत भावनिक लाट हा मुद्दा लक्षवेधी ठरणार आहे. बारामती मतदारसंघातून सुप्रिया सुळे यापूर्वी सन 2009, 2014, 2019 अशा तीन वेळा निवडून आल्या आहेत. आता बदलत्या परिस्थितीत त्या चौकार मारण्यात यशस्वी होतात की नाही हे समजण्यासाठी 4 जूनपर्यंत थांबावे लागणार आहे, तर सुनेत्रा पवार या प्रथमच निवडणूक लढवीत आहेत. अजित पवार यांनी पत्नीस उमेदवारी देऊन आपले
राजकीय कसब पणास लावले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी बारामती लोकसभा मतदारसंघात महायुती कामास लागली आहे.

प्रथमच उमेदवारांकडून 2 महिने अगोदर प्रचार सुरू

यापूर्वी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाल्यावरच लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली जात व त्यानंतर उमेदवारांचा प्रचार सुरू होत असे. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच उमेदवारांचा प्रचार हा मतदानापूर्वी तब्बल 2 ते अडीच महिने अगोदर प्रचार सुरू झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. यावरून बारामती लोकसभेची निवडणूक किती तुल्यबळ व प्रतिष्ठेची आहे, याचा अंदाज येत आहे.

गल्लोगल्ली राजकीय विश्लेषक!

अलीकडे सोशल मीडियाचा वापर वाढल्याने गावोगावी गल्ली ते दिल्लीपर्यंत चर्चा करणारे राजकीय विश्लेषक तयार झाले आहेत. अनेकदा त्यांची मते ऐकून काही वेळेला हसावे की रडावे असा प्रश्न निर्माण होत आहे, त्यामुळे मात्र करमणूकही होत आहे. सध्याच्या अस्थिर राजकीय वातावरणात सोशल मीडियामुळे गल्लीतील राजकीय विश्लेषकांच्या पारावरती गप्पांनाही महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाय घराघरात गृहिणीदेखील सोशल मीडियामुळे राजकीय परिस्थितीचा अंदाज व्यक्त करीत आहेत.

हेही वाचा

SCROLL FOR NEXT