Baramati public protest
बारामती: बारामतीतील खंडोबानगर येथील महात्मा फुले चौक परिसरात रविवारी (दि. 27) हायवा डंपरच्या धडकेत वडिलांसह त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी सोमवारी (दि. 28) येथील महात्मा फुले चौकात रास्ता रोको आंदोलन केले. शहरातील भरधाव वेगाने मालवाहतूक वाहने जात असताना प्रशासनाकडून कारवाई केली जात नाही. त्यामुळे आणखी किती निष्पाप जिवांचे बळी हवेत? असा संतप्त सवाल करीत बारामतीकरांनी प्रशासनाला धारेवर धरले.
डंपरने दिलेल्या धडकेत ओंकार राजेंद्र आचार्य, त्यांची मुलगी सई व मधुरा या तिघांना रविवारी जीव गमवावा लागला. या धक्क्यामुळे ओंकार यांचे वडील राजेंद्र आचार्य यांचेही सोमवारी निधन झाले. अपघातामुळे आचार्य कुटुंबाला मोठ्या धक्क्याला सामोरे जावे लागले. बारामतीकरसुद्धा या घटनेने संतप्त झाले. नागरिकांनी एकत्र येत खंडोबानगर येथील महात्मा फुले चौकात रास्ता रोको आंदोलन केले. रस्त्यावरच ठिय्या मांडत प्रशासनाला जाब विचारण्यात आला. (Latest Pune News)
या भागात अतिवेगाने वाहने जातात. त्यामुळे तत्काळ गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली. जोपर्यंत हा निर्णय होत नाही तोपर्यंत रस्त्यावरून उठणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. महात्मा फुले चौकात यापूर्वीही वारंवार जीवघेणे अपघात झाले आहेत. त्यात निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. रास्ता रोको आंदोलनावेळी संतप्त नागरिकांनी पोलिस प्रशासनाचेही वाभाडे काढले. अन्य शासकीय खात्यांवरही नागरिकांनी रोष व्यक्त केला. आणखी किती निष्पापांचे बळी गेल्यावर प्रशासन उपाययोजना करणार? असा सवाल उपस्थित करण्यात आला.
शहरातून भरधाव धावणारे डंपर हायवाचालक नागरिकांच्या जिवाशी खेळत आहेत. अनेक वाहनांना क्रमांक नाहीत. वाहनांवर प्रशिक्षित चालक नाहीत. वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत, त्यामुळे अपघात घडत असल्याच्या भावना व्यक्त केल्या गेल्या. उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी नागरिकांच्या भावना जाणून घेतल्या.
अवजड वाहनांना बंदी, सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करणार
बारामती शहरासह रिंगरोडवर अवजड वाहनांना तत्काळ बंदी घातली जाईल. शहरातील प्रमुख चौकात वाहतूक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित केली जाईल. शहरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे. त्याचाही प्रशासनाकडून पाठपुरावा केला जात असल्याचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांनी या वेळी स्पष्ट केले.