बारामती: कर्करुग्णांना स्थानिक स्तरावर उपचार मिळावेत या उद्देशाने राज्य शासनाने शासकीय महाविद्यालयांशी संलग्न कॅन्सर रुग्णालय मंजुरीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार बारामतीत तृतीय स्तरावरील कॅन्सर रुग्णालय उभारणीस मंजुरी मिळाली आहे. यामुळे पुणे जिल्ह्यासह सोलापूर, अहिल्यानगर आदी जिल्ह्यातील रुग्णांची सोय होणार आहे. (Latest Pune News)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रयत्नातून बारामतीत हे रुग्णालय उभे राहत आहे. बारामतीत कॅन्सर रुग्णालय उभारणीचा मनोदय पवार यांनी अनेकदा बोलून दाखविला होता. त्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालया जवळील एसटी कार्यशाळेची जागा घेतली जाणार आहे. ही कार्यशाळा कटफळ गावच्या हद्दीत स्थलांतरीत केली जाणार आहे.
राज्य शासनाने बारामतीसह अंबाजोगाई (बीड), यवतमाळ, मुंबई (कामा आणि आल्ब्लेस रुग्णालय), सातारा, जळगाव, रत्नागिरी, ठाणे आणि शिर्डी संस्थानचे रुग्णालय या नऊ ठिकाणी तृतीय स्तरावरील कॅन्सर उपचार केंद्रांच्या स्थापनेला मंजूरी दिली आहे. कर्करोग उपचार, संशोधन आणि शिक्षणासाठी महाराष्ट्र कॅन्सर केअर रिसर्च अॅण्ड एज्युकेशन फाउंडेशन ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. त्यामध्ये संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री निमंत्रित सदस्य असणार आहेत.
यासह तृतीय स्तरावरील संस्थांचे रूपांतर उच्च स्तरावरील संस्थांमध्ये करण्यास आणि या संस्थांची संख्या १३ पर्यंत वाढविण्यास शासनाने मंजूरी दिली. छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, मुंबई (जे.जे.), कोल्हापूर, पुणे (बी.जे), नांदेड तसेच नाशिक व अमराती येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांमध्ये कर्करोगासंबंधी पदव्युत्तर आणि अतिविशेषोपचार शिक्षण उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
बारामती बनणार मेडिकल हब
बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह शासकीय आयुर्वेद महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. यासह आता कॅन्सर रुग्णालयाची भर पडत आहे. दंत आरोग्य महाविद्यालय बारामतीत सुरू करण्याचा उपमुख्यमंत्री पवार यांचा मानस आहे. त्यामुळे बारामतीत आरोग्यविषयक सुविधा आगामी काळात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणार आहेत.