Baramati By-Election Result 2026 Pudhari
पुणे

Baramati By-Election Result 2026: बारामतीत सुनेत्रा पवारांचा रेकॉर्डब्रेक विजय; तरीही शहरात जल्लोष नाही

अजित पवारांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर बारामतीकरांनी संयम राखत ऐतिहासिक विजय शांततेत साजरा केला

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या उमेदवार तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देशात रेकॉर्डबेक विजय मिळविल्यानंतर बारामतीकरांनी संयमितपणे हा विजय साजरा केला. या मोठ्या विजयाला अजितदादांच्या अकाली एक्झिटची दुःखद किनार असल्याने निकालानंतर केंद्राबाहेर अथवा शहर-तालुक्यात कुठेही जल्लोष साजरा झाला नाही. गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी झाली नाही. मिरवणुका टाळण्यात आल्या.

बारामतीची पोटनिवडणूक ही अपघाती घटनेमुळे लागली गेली. अजितदादांसारखा विकासाचा ध्यास घेतलेला नेता अर्ध्यावर अचानक गेल्याने बारामतीकर सुन्न झाले होते. त्यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासह पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली. बारामतीकरांनी मतांतून त्यांना भरभरून साथ देत अजितदादांवरील प्रेम व्यक्त केले तसेच संयमाने विजय साजरा करीत वेगळा आदर्शही घालून दिला. मतमोजणी केंद्राबाहेरही शुकशुकाट होता. एरवी निवडणूक निकाल म्हटला की कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळायची. यंदा ते चित्र दिसले नाही.

नगराध्यक्ष, पंचायत समिती सभापती यांना काढले मतमोजणी केंद्राबाहेर

येथील राज्य वखार महामंडळाच्या गोदामात मतमोजणी झाली. मतमोजणीवेळी नगराध्यक्ष सचिन सातव व पंचायत समितीचे सभापती किरण तावरे केंद्रात उपस्थित होते. लोकप्रतिनिधी असल्याने त्यांच्या उपस्थितीवर आक्षेप घेण्यात आला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांना केंद्राबाहेर जाण्यास सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT