Jay Pawar Pudhari
पुणे

Baramati By-Election: बारामती पोटनिवडणूक; बिनविरोधची इच्छा, पण लोकशाहीचा अधिकार कायम

बारामती पोटनिवडणुकीबाबत जय पवारांचे मत; बिनविरोधची इच्छा, तसेच विमान अपघात व राजकीय घडामोडींवर भाष्य

पुढारी वृत्तसेवा

बारामती: बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आमची इच्छा आहे. परंतु, लोकशाहीत प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा अधिकार असतो, त्यामुळे कोणाला निवडणूक लढवायची असेल तर ते लढवू शकतात, असे मत युवानेते जय पवार यांनी व्यक्त केले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातप्रकरणी आता अंतिम अहवाल आल्यावरच मी बोलेन; परंतु या प्रकरणात विमान कंपनीच्या मालकाला अटक होणे गरजेचे होते, असे त्यांनी सांगितले.

बारामती तालुक्यात अवकाळीने झालेल्या नुकसानीची त्यांनी शनिवारी पाहणी केली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची सोमवारी (दि. 6) अंतिम मुदत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवारी अर्ज दाखल करणार आहेत. महायुती म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांनाही या वेळी उपस्थित राहण्याची विनंती केली आहे. राष्ट्रवादीतील प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ आदी वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याची माहिती जय पवार यांनी दिली.

ते म्हणाले की, शरद पवार यांचाही निवडणूक बिनविरोध व्हावी, असा आग््राह आहे. बारामतीकरांचेही तेच मत आहे. अत्यंत दुःखद प्रसंगात ही निवडणूक होत आहे. कॉंग््रेास लढणार असल्याचे सांगितले जात आहे. पण, अद्याप त्यांनी उमेदवार दिलेला नाही. घडामोडी सुरू आहेत.

बिनविरोधासाठी आमचे वरिष्ठ नेते संबंधितांशी बोलतील, गरज पडली, तर आम्हीही बोलू. विलीनीकरणाचा निर्णय वरिष्ठ घेतील राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा निर्णय उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि अन्य वरिष्ठ घेतील. त्या विषयात मी बोलणे योग्य नाही. कुटुंब म्हणून सगळे पवार एकत्रच आहेत. राजकारणाबाबत मला संभाषण करणे योग्य वाटत नसल्याचे ते म्हणाले.

विमान कंपनीच्या मालकाला अटक का नाही?

विमान अपघातासंबंधीची पत्रकार परिषद रद्द केल्याबद्दल ते म्हणाले की, मी जे मुद्दे मांडणार होतो ते रोहित पवार यांनी मांडले होते. त्यामुळे मी पत्रकार परिषद घेतली नाही. आता अंतिम अहवाल आल्यावरच मी त्यासंबंधी बोलेन. विमान कंपनीचे मालक विमानाच्या पायलट कक्षात झोपले असल्याचा व्हिडीओ मी समाज माध्यमावर टाकला होता. बिल्डिंगला अपघात झाला तर इंजिनिअरला नव्हे तर मालकाला अटक होते. रेस्टॉरंटला आग लागली तर मालकाला अटक होते; मग इथेही मालकाला अटक का झाली नाही? असा सवाल त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT