Baramati By Election 2026 pudhari
पुणे

Baramati By Election 2026: सुनेत्रा पवारांचा मार्ग मोकळा; आता माघार मात्र २०२९ ला आमचाच आमदार... सपकाळांनी बारामतीत ठोकला शड्डू

पुढारी न्यूजचे वृत्त ठरले खरे... अखेर काँग्रेसच्या उमेदवारानं घेतली माघार

Anirudha Sankpal

Baramati By Election 2026 : बारामती पोटनिवडणुकीत दुपारी एक मोठा ट्विस्ट आला. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी आपला अर्ज मागे घेत सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा करून दिला. मात्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आम्ही अर्ज मागे घेतोय. मात्र २०२९ ला आमचाच आमदार असेल असं सांगत भविष्यातला मोठा दावा केला. दरम्यान, काँग्रेसच्या उमेदवाराने अर्ज मागे घेतल्यामुळं आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेवटच्या क्षणी शिष्टाई आली कामी

आज बारामती पोट निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे हे काय करणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर दिल्ली पातळीवरील शिष्टाई कामी आली अन् काँग्रेसने ऐनवेळी आपला उमेदवार मागे घेतला. यामुळं दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सगळ्या मतदार संघात सारखा आग्रह धरायला हवा

दरम्यान, यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी, जो आग्रह बारामती मतदार संघात धरला गेला तोच आग्रह इतर मतदार संघात देखील धरायला हवा. तो राहुरीतही धरला गेला पाहिजे असं वक्तव्य करत शिष्टाई ही समान असली पाहिजे याकडे सर्वांचे लक्ष वेधले. ज्यावेळी काँग्रेसचे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जागेवर त्यांच्या पत्नी जयश्री जाधव यांच्याविरूद्ध भाजपने उमेदवार दिला अन् ती निवडणूक चुरशीची झाली त्याची अप्रत्यक्ष आठवण सपकाळांनी करून दिली.

बारामतीचा पुढचा आमदार आमचाच

सपकाळ एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पुढच्या निवडणुकीत बारामतीत काँग्रेसचा आमदार झाल्याचं दिसेल असं म्हणत एकप्रकारे बारामती विधानसभा जागेवर काँग्रेसची दावेदारीच ठोकली. तसेच सपकाळ यांनी वैचारिक भूमिका म्हणून काँग्रेसने बारामतीत उमेदवार दिल्याचे देखील सांगितलं. तसेच आम्ही अजित पवार यांच्यासाठी ही माघार घेत आहोत असं सांगत टोला लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन सपकाळांना फोन केला होता त्यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी हे वक्तव्य केलं.

दरम्यान, काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आकाश मोरे यांनी अर्ज मागे घेताना पक्षाने मला थांबायला सांगितलं म्हणून मी थांबतोय असं सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT